मराठवाडय़ात अनेक ठिकाणी पाणीपातळी एक हजार फुटांपर्यंत खोलवर गेली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात आली असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
परतूर तालुक्यात जलयुक्त शिवार कामांची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना लोणीकर म्हणाले की, नद्या, नाले, तलाव तसेच अन्य विविध प्रकल्पांमधील गाळ साचल्यामुळे पावसाच्या पाण्याची साठवण होण्याऐवजी ते वाहून जाते. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील ५ हजार गावात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे ठरविले असून जालना जिल्ह्य़ातील २१२ गावांचा यात समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानास लोकचळवळीचे स्वरूप येण्याची गरज आहे. परतूर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी १३ गावांची निवड करण्यात आली. तेथे १९६ कामे मंजूर करण्यात आली. पैकी १४७ कामे पूर्ण झाली, ४९ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर आतापर्यंत ४ कोटी ९८ लाख रुपये खर्च झाला.
जलयुक्त शिवारप्रमाणे राज्यात स्वच्छता अभियानही राबविण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत ४ हजार गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. आणखी १० हजार गावे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी जनतेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. जालना शहरासह जिल्ह्य़ात अन्य तालुक्यातही महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर कचरा उचलण्यात आल्याचे लोणीकर म्हणाले.

Story img Loader