मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. दत्ता भगत यांची निवड झाली.
प्रा. भगत यांची निवड केल्याचे परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले. परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कोषाध्यक्ष प्रा. भास्कर बडे, कार्यवाह डॉ. दादा गोरे, मसाप जालना शाखेचे अध्यक्ष प्रा. जयराम खेडेकर या वेळी उपस्थित होते. १२ व १३ मार्च रोजी हे संमेलन होणार असून विनयकुमार कोठारी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ‘कोठारी एज्युकेशन हॅब, जालना’ या शिक्षण संस्थेच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले आहे.
प्रा. भगत यांच्या रूपाने पहिल्यांदाच एक नाटककार मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवत आहे. अश्मक, खेळिया आणि वाटा पळवाटा ही त्यांची गाजलेली नाटके असून ‘आवर्त आणि इतर एकांकिका’, जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका’ हे एकांकिका संग्रह, शोध पायवाटांचा, पिंपळ पानांची सळसळ हे ललित लेखक संग्रह आणि दलित साहित्य : दिशा आणि दिशांतर, दलित साहित्य : वाङ्मयीन प्रवाह, निळी वाटचाल, आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पाश्र्वभूमी आणि समकालीन साहित्य आणि समीक्षा हे समीक्षाग्रंथ व ‘राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा चरित्रग्रंथ आदी विपुल लेखन त्यांनी केले आहे. प्रसिद्ध नाटककार, समीक्षक, ललित लेखक, एकांकिकाकार, चरित्रकार व ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच तिसऱ्या अखिल भारतीय दलित नाटय़संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते परिचित आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि विशेष म्हणजे २०१० मध्ये महाराष्ट्र राज्याचे पुढील ५० वर्षांसाठीचे सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या लेखनाला राज्य सरकारसह अनेक संस्थांचे पुरस्कार मिळालेले असून अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या दलित साहित्य लेखन गौरव पुरस्कारही मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा