छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी भरती संदर्भातील नेमणुकांबाबत “जैसे-थे” परिस्थिती ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा व विनय कारगांवकर यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनीषा कांगळे आणि शुभम बहुरे यांनी तलाठी भरती विरोधात न्यायाधिकरणामध्ये अॅड. प्रसाद जरारे व अॅड. अभिजीत ठोंबरे यांच्यावतीने मूळ अर्ज दाखल केला होता. या तलाठी भरतीची जाहिरात दि. २६ जून २०२३ रोजी राज्य परिक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली होती व त्या अनुषंगाने टी. सी. एस. संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे व त्यामुळे अर्जदार व इतर परिक्षार्थींचे नुकसान होऊन ते तलाठी भरतीची संधी गमावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, प्रतिवाद्यांनी केलेली कार्यवाही ही कायद्याच्या चैकटीत नसून नैसर्गिक न्यायतत्वांना सुसंगत नसल्याचे युक्तिवाद प्राधिकरणासमोर करण्यात आला.

हेही वाचा – तुळजापूरला रेल्वेचे मोठे जंक्शन होणार; अर्चना पाटील यांना मत म्हणजे मला मत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हेही वाचा – निवडणुकीपेक्षाही पाणीटंचाईशी दोन हात महत्त्वाचे; मराठवाड्यातील दुष्काळी प्रदेशात प्रचाराचा मागमूसही नाही

अर्जदारांचे नाव निवड यादीमध्ये असताना सदर यादी अनेकदा दुरुस्त करून त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली होती, म्हणून अर्जदारांचे नाव निवड यादीमध्ये समावेश करून प्रतिवाद्यांनी अर्जदारांना नेमणूक आदेश द्यावे अशी विनंती मूळ अर्जामध्ये करण्यात आली आहे. अर्जदारांच्या वतीने अॅड. प्रसाद जरारे व अॅड. अभिजीत ठोंबरे यांनी काम पाहिले. तसेच, शासनाच्या वतीने मुख्य सादरकर्ते एम. बी. भारसवाडकर यांनी काम पाहिले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mat order regarding chhatrapati sambhajinagar talathi recruitment ssb