बिहारमधील निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाती किती इंची आहे हेच बिहारच्या जनतेने दाखवून दिल्याचे मत खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले.
सातव यांच्या येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी त्यांच्या हस्ते झाले. यानंतर पत्रकारांशी बोलताना बिहार निवडणुकीच्या निकालाबाबत त्यांनी संवाद साधला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश थोरात, शहराध्यक्ष बापूराव बांगर, विलास गोरे, मुजीब पठाण आदींची उपस्थिती होती. सातव म्हणाले, की बिहारच्या निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. यापुढे मोदी सरकार व भाजपचा पराभव हा काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा असेल. समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढविल्या जातील. बिहारच्या निवडणुकीत राहुल गांधी यांची भूमिका निर्णायक ठरली. लालूप्रसाद यादव व नीतिशकुमार एकमेकांचे कट्टर विरोधक होते. त्यांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधी यांनी केल्याचा दावा त्यांनी केला.
बिहारच्या निवडणुकीत मोदी यांनी ज्या ३५ विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या. त्या ठिकाणी भाजपचे ८-९ उमेदवार विजयी झाले. मात्र, ज्या २५ ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या मतदारसंघांत त्यांना भोपळाही फोडता आला नाही. मोदींची लाट व जादू जनतेने नाकारली. हा देश सर्व जातिधर्माचा आहे, हेच या निकालाने दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमधील निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका लक्षात घेता फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही. ही निकालाची नांदी असून, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा