हिंगोली : मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमधील काही भागांना बुधवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पाच सेकंदांपर्यतचे धक्के फटाका बॉम्ब फुटल्या नंतरच्याप्रमाणे किंवा फॅन अचानक बंद पडल्यानंतरच्या सारखे होते, असे काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
आज सकाळी ०७:१५ वा हिंगोली येथील संत नामदेव नगर हिंगोली येथे भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. आज दि. १० जुलै २०२४ रोजी हिंगोली शहर व हिंगोली सर्वच तालुक्यातून वसमत औंढा नागनाथ कळमनुरी परिसरात आज बुधवारी सकाळी ७:१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हेही वाचा…एक उमेदवार हरणार हे नक्की, पण तो कुणाचा? वाचा विधानपरिषद निवडणुकीसाठीचं पक्षीय बलाबल!
भूकंपाचे धक्के जाणवताच हिंगोली शहरातील अनेक भागातील नागरिकांनी घाबरून घरातून बाहेर रस्त्यावर धावपळ सुरू केले सर्वत्र एकच चर्चेचा विषय बनला. जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत.असे आवाहन हिंगोली चे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
जालन्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले. छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी, पिसादेवी, कांचनवाडी व इतरही काही भागात, घरालाही धक्के जाणवले आहेत.