छत्रपती संभाजीनगर – बीड शहरासह वडवणी, राजुरी व इतर काही ग्रामीण भागात मंगळवारी संध्याकाळी८.२१ वा. मोठे दोन आवाज झाले. या आवाजाने घरातील साहित्य, फर्निचर तसेच भांडी खणखणले. परंतु हे गूढ आवाज म्हणजे भूकंपाचे सौम्य धक्के असल्याची माहिती येत आहे. समाजमाध्यमावर भूकंप मापन यंत्रणेचे एक संकेतस्थळावरील छायाचित्र पसरले असून त्यावरील माहितीनुसार भूकंपाचे केंद्र गेवराईनजीक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासन भूकंप मानत नाही.

बीडचे प्रभारी तहसीलदार सुहास हजारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली असून त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळ्यांमधून असे आवाज येत असतात. दरम्यान प्रभारी तहसीलदार हजारे यांच्याकडून भूकंपाच्या सौम्य धक्क्यांबाबत दुजोरा मिळालेला नाही. मात्र भूकंप आणि त्याचे केंद्र गेवराईजवळ असल्याचा संदेश समाज माध्यमावर प्रसृत होत आहे.

Story img Loader