लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी आमदार मिलिंद एकबोटे यांचे समर्थक कार्यकर्ते, हिंदू एकता मोर्चाचे कार्यकर्ते खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती असल्याने त्यांना व त्यांच्या समर्थकांना जिल्ह्यात प्रवेश बंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. ही बंदी १६ मार्च ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीसाठी असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान खुलताबादमध्ये पोलिसांनी बंदोबस्तही वाढला आहे. औरंगजेबाची कबर सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित आहे.
मिलिंद एकबोटे हे अत्यंत कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते असून या पूर्वी भीमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याचा आणि इतर धर्मीयांच्या व समाजाच्या भावना दुखावण्याबाबतचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यभर आहे. यातील काही कार्यकर्ते संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वढू – तुळापूर दरम्यान संभाजी महाराज श्रद्धांजली यात्रा काढतात. या यात्रेत सहभागी होणारे काही जण कबर नष्ट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे येणार असल्याचा अहवाल छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी दिला होता. त्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जिल्हा बंदीचे आदेश बजावले आहेत.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीनेही कबर नष्ट करण्याचा इशारा नुकताच दिला असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य राखीव दलाचे काही जवान खुलताबादला तैनात करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘जिल्ह्यात येण्यास प्रतिबंध असल्याचे आदेश त्यांना बजावण्यात आले आहेत. राखीव दलाचे जवान आणि पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.’