जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सकारात्मक काम करावे. आगामी काळात टंचाईची वाढती तीव्रता लक्षात घेऊन विविध यंत्रणांनी उपाययोजनांची प्रक्रिया तत्काळ मार्गी लावावी, अशा सूचना देतानाच येत्या काही दिवसांत मागेल त्याला शेततळे योजनेचा आदेश दिला जाईल, असे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात रविवारी डॉ. सावंत यांनी जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेतला. जि.प. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार मधुकरराव चव्हाण व राणा जगजीतसिंह पाटील, जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, मंत्रालयातील रोजगार हमी योजना विभागाचे उपसचिव डॉ. प्रमोद िशदे आदींसह चारही विभागांचे उपविभागीय अधिकारी, आठही तालुक्यांचे तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी संभाव्य कृती आराखडा तयार असला, तरी संभाव्य उपाययोजना काय करता येतील, हे लक्षात घेऊन त्याचा समावेश या आराखडय़ात करावा. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्या योजनांचे प्रस्ताव मान्यतेसाठी तत्काळ संबंधित यंत्रणेकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाणीपुरवठा करताना लोकसंख्येबरोबरच पशुधनाची संख्याही विचारात घ्यावी, या लोकप्रतिनिधींच्या सूचनेला होकार देऊन या संदर्भात कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी चारा, पाणी, रोजगार हमी, पुरवठा आणि जलयुक्त शिवार अभियान अशा पंचसूत्रीवर जिल्ह्यात काम सुरू असल्याचे, तसेच टंचाई निवारणार्थ जिल्ह्यास १७ कोटी रुपये निधी आल्याचे सांगून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे १० कोटींची मागणी केल्याचे सांगितले. जिल्ह्यात ८४ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली. पकी ७५ छावण्या कार्यान्वित झाल्याचे ते म्हणाले.