जिल्ह्यात मागील आठवडय़ात ठरलेला पाणीपुरवठा मंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाला. उद्या (शुक्रवारी) कयाधू प्रश्नावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन जिल्हय़ात येणार असल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली. दौऱ्याची भाजपकडून जोरदार तयारी झाली आणि अचानक मंत्र्याचा दौरा रद्दही झाला. त्यामुळे कयाधू नदीवरील बंधारे ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ ठरते की काय? मंत्रीसुद्धा पाठ फिरवत असल्याने जिल्ह्यास कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कयाधू नदीवरील बंधाऱ्याच्या प्रश्नावर वर्षभरापासून आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी ४ वेळा राज्यपालांची भेट घेतली. खुद्द राज्यपालच िहगोली दौऱ्यावर येणार असल्याचे मुटकुळे यांनी सांगितले होते. त्यानंतर २६ जानेवारीला सिंचनाच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मोर्चात मंत्री दिलीप कांबळे सहभागी झाले होते. एक महिन्यात सिंचनाचा मुद्दा निकाली निघणार होता. त्यासाठी मंत्रालयात बठकीचे आयोजनही करण्यात आल्याचे सांगितले गेले.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सर्वत्र पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान ३ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. िहगोली तालुक्यात ६३ हेक्टरवरील फळबागा व रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा प्रथमदर्शनी अहवाल तहसीलदार किरण आंबेकर यांनी दिला, तर औंढा नागनाथ तालुक्यात १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात २५ हेक्टर फळबागांचाही समावेश आहे.
जिल्ह्यात सिंचनाचा मुद्दा १० वर्षांपासून गाजत आहे. िहगोलीचे आमदार दर महिन्याला कयाधू नदीवरील बंधाऱ्याच्या प्रश्नावर वेगवेगळी माहिती देत लवकरच बंधाऱ्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगतात. डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, अजून तरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा प्रश्न निकाली निघाला नाही. यासाठी जमीन हस्तांतराचे काम प्रलंबित आहे.
िहगोलीत २७ फेब्रुवारीला पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचा पाणीप्रश्नावर दौरा होता. दौऱ्याची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाने केली, मात्र अचानक दौरा रद्द झाला. दौरा रद्द झाल्याची चर्चा संपते न् संपते तोच शुक्रवारी कयाधूच्या प्रश्नावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन िहगोलीतील गांधी चौकात शेतकऱ्यांसोबत बठक घेऊन सिंचनाचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे सांगण्यात आले. महाजन प्रथमच िहगोलीत येणार असल्याने भाजपची यंत्रणा कामाला लागली होती. जलसंपदामंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कयाधू नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न निकाली निघेल, असे वाटत असताना अचानक जलसंपदामंत्र्याचाही दौरा रद्द झाला.
दुष्काळग्रस्त जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी एकही मंत्री जिल्ह्याकडे फिरकला नाही. हीच अवस्था अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहण्यास मंत्र्यांना वेळ नाही, असे दिसते. संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्यांचा दौरा करीत असताना िहगोली जिल्हा मात्र त्यात नसल्याने या जिल्ह्याचे मंत्र्यांना वावडे आहे काय, अशी चर्चा होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा