छत्रपती संभाजीनगर : आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरण ‘धसा’स लावण्यासाठी ‘आका’ आणि ‘आकाचे आका’ हे शब्दप्रयोग रुजवले. ‘देवाच्या काठीचा आवाज होत नाही,’ असे ते म्हणातात. परंतु धस यांच्या भोवताली आजही प्रश्न कायम आहे, त्यांना माहिती मिळते कोठून? त्यांच्या इरसाल व्यक्तिमत्त्वात या प्रश्नाची उत्तरे दडली आहेत.

देशमुख हत्या प्रकरणात अमित शहा यांच्याबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे छायाचित्र समोर आल्यानंतर सुरेश धस यांची वक्तव्ये जाहीर होऊ लागली. धस, प्रकाश सोळंके ही मंडळी धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला पूर्वीही विरोध करत होती. मात्र, आरोप झाले की त्याला जातीय किनार देण्यात यश मिळत गेले. धस यांनी मात्र मुंडे यांच्या विरोधात आधी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या असमान वाटपावरून प्रश्नचिन्ह उभे करायला सुरुवात केली. याच काळात पवन ऊर्जा प्रकरणातील खंडणीचे प्रकरण त्यांच्या हाती लागले. यातील सूत्रधार वाल्मीक कराड आहे, हे बीडकरांना माहीत असणारे सत्य धस आवर्जून मांडत होते.

एकाच वेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर आरोप करणारे धस हे अजित पवार यांच्याशीही जवळीक बाळगून होते. याच काळात कुंटेफळ येथील सिंचन प्रकल्पाच्या उद्घटनास मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यामुळे धस यांना मुख्यमंत्र्यांचे बळ असल्याचा राजकीय संदेश गेला होता. मात्र, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस आणि मुंडे यांची तासभर भेट झाल्याची बातमी माध्यमांना दिली आणि धस यांचीही कोडी झाली. आता मुंडंनी राजीनामा दिल्यानंतर धस पुन्हा चर्चेत आले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर १९ ऑक्टोबरला ‘आवादा’ कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी निश्चित करण्यासाठी बैठक झाली होती. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांची चौकशी विशेष तपास पथकाने करावी आणि न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करावे. – सुरेश धस, आमदार

दमानियांची आक्रमकता

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेली अडीच महिने धनंजय मुंडे यांची अनेक प्रकरणे उघड केली. देशमुख यांच्या हत्ये-प्रकरणी मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मीक कराडचा सहभाग, मुंडे कृषिमंत्री असताना केलेले गैरव्यवहार, मुंडेची बीडमधील दहशत व जमिनी लाटण्याचे प्रकार अशा अनेकविध मुद्द्यांवर दमानिया सातत्याने लढत राहिल्या. मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढत राहणार असल्याचा इशारा दमानिया यांनी दिला आहे. दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता मुंडे यांनी बीडमध्ये दादागिरी करून जमिनी लाटल्याचे आरोप दमानिया यांनी केले आहेत. त्यांची आमदारकीही काढून घेण्यात यावी, अशी मागणी आहे. ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत मुंडेचा पाठलाग सोडणार नाही, असा इशारा दमानियांनी दिला आहे.

Story img Loader