किरकोळ कारणावरुन खडाजंगी झाल्याने जिल्हाध्यक्षाने सहसचिव पदावरून पद्च्युत केल्यामुळे चिडलेल्या मनसे कार्यकर्त्याने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अॅड. अभय मांजरमकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या मनसैनिकाचे नाव असून अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. याप्रकरणी औरंगाबादमधील वेदांतनगर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

अधिक माहिती अशी, अॅड. मांजरमकर हे दि. २७ डिसेंबर रोजी औरंगाबादमधील रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल विट्समध्ये लग्नाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी मद्यपान केले. त्यांनी हॉटेलच्या सरव्यवस्थापकाला मनसेचे नाव घेत मारहाण करण्याची धमकी दिली व बिल न देता काढता पाय घेतला. हॉटेल प्रशासनाने या प्रकाराची लेखी तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्याकडे केली.

दरम्यान, मनसेचे मराठवाडा संपर्क प्रमुख राजीव पाटील २८ डिसेंबर रोजी शहरात आले असतांना खांबेकर यांनी घडलेला प्रकार पाटील यांना सांगितला. त्यानंतर मांजरमकर यांना पदावरुन काढून टाकल्याचे पत्र खांबेकर यांनी दिले. त्यामुळे चिडलेल्या मांजरमकर यांनी राज ठाकरे यांच्या नावाने सुसाईड नोट लिहीत रविवारी दुपारी ४ वाजता मनसे शहर प्रमुख बिपीन नाईक यांच्या कार्यालयासमोर फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्यांनी व्हाॅटसअॅपवर आत्महत्या करत असल्याचे मेसेज पाठवले होते. दोन तास त्यांच्या मेसेजची दखल कोणीही घेतली नाही. शेवटी ४ वाजता मनसेचे गौतम आमराव यांनी मांजरमकरांना फोन केला. त्यावेळी त्यांनी फिनेल घेतले होते. त्यांना ताबडतोब उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

Story img Loader