सुहास सरदेशमुख

विक्रीत दुप्पट घट, नोटाबंदी आणि दुष्काळानंतर घसरण

पाच वर्षांपूर्वीची ‘मोदी जॅकेट’ची फॅशन आणि वेड आता ओसरले आहे. २०१४ च्या तुलनेत या जॅकेटची विक्री आता निम्म्यावर आली आहे. नोटाबंदी आणि दुष्काळानंतरच या जॅकेटच्या मागणीत घट व्हायला सुरुवात झाली आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

हा अनुभव आहे या जॅकेटच्या शिलाईसाठी प्रसिद्ध असलेले रत्नाकर तांदळे  यांचा.  त्यांच्या छोटय़ाशा पण गजबजत्या दुकानात भगवी, सोनेरी, पांढरी अशी  किती तरी  रंगांची जॅकेट लटकलेली दिसतात. ती पाहात ते सांगत होते, ‘‘जॅकेट खरेदीसाठी आताशा कोणी आवर्जून येत नाही. ती क्रेझ संपली हो. २०१४ मध्ये दिवसाला ३५ जॅकेट विकली जायची. आचारसंहिता लागली तेव्हा तर गर्दी होती दुकानात. आता आठवडय़ात एखादे जॅकेट जाते. तो धंदा आता काही उरला नाही. गेल्या दोन वर्षांपासून हीच स्थिती आहे,’’ मोदी जॅकेटच्या शिलाईसाठी प्रसिद्ध असणारे टेलर तांदळे यांच्या सांगण्यानुसार, आता अगदी निम्म्यावर व्यवसाय आला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या जॅकेटची फॅशन आली. अगदी प्रत्येकाला मोदी जॅकेट घालायचे होते. मोठी घाई होती तेव्हा. औरंगाबाद शहरातील केशवराव या प्रसिद्ध टेलरकडे तेव्हा केवळ हे जॅकेट शिवण्यासाठी १५ कारागीर कामाला होते. आता पाच जण काम करीत आहेत. पण त्यांनाही पुरेसे काम देता येत नाही, अशी खंत केशवराव यांचा मुलगा विनोद दयानंद सिंगू यांनी व्यक्त केली.

सिंगू हे १९८० साली आंध्र प्रदेशातून आले आणि औरंगाबाद येथे स्थायिक झाले. शिलाई काम हा परंपरागत व्यवसाय. जॅकेट, कोट शिवण्यात त्यांचा आणि तांदळे यांचा कोणी हात धरत नाही. मोठय़ा नजाकतीने मापात कोणतीही चूक न करता त्यांनी शिवलेले कपडे अनेकांना आवडतात. विशेषत: शहरातील आणि भोवतालच्या गावातील नेतेमंडळी दुकान शोधून त्यांच्याकडे कपडे शिवण्यासाठी येत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये मोदी जॅकेटची फॅशन आली. मोदी लाटेत प्रत्येकाला सहभागी व्हायचे होते. त्यामुळे प्रत्येकाला जॅकेट शिवायचे होते. आंध्रातून आलेले टेलर संगू सांगत होते, ‘जॅकेट आता पोशाखाचा भाग बनू लागला आहे. विशेषत: लग्नकार्यात जॅकेट घालणारी मंडळी वाढली आहेत. मात्र, जी फॅशनची लाट २०१४ मध्ये दिसून येत होती ती तशी आता नाही.’

साधारणत: एक जॅकेट शिवण्यासाठी ८०० ते एक हजार रुपये रक्कम आकारली जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवस तयार जॅकेटची बाजारपेठेतही तेजी होती. मग जॅकेटचा जोर ओसरला. शहरातील शहागंज परिसरात गांधी पुतळ्याजवळ गेली ७५ वर्षे शिवणकामाच्या व्यवसायातील एस. एम. तांदळे म्हणाले, ‘‘राजकीय नेते पूर्वी जॅकेट घालायचे. पुढे प्रत्येक कार्यकर्त्यांलाही ते हवेसे वाटू लागले. मग जॅकेटची हवा ओसरली. पण काही दिवसांपूर्वीपर्यंत लग्नसराईमध्ये जॅकेट घालण्याचे प्रमाण होते. मग नोटाबंदी आली. आता दुष्काळ आला आहे. त्यामुळे पूर्वीसारखी जॅकेट विकली जात नाहीत. आपल्याकडे फॅशन बदलत राहते. आता मोदी जॅकेटची मागणी कमी झाली आहे.’’