छत्रपती संभाजीनगर – अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने मुलीचे पार्थिव रुग्णालयातच सोडून आई पसार झाल्याचा प्रकार बीडमध्ये शुक्रवारी घडला. अखेर शनिवारी दुपारी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून मृत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूजा (वय ७), असे मृत मुलीचे तर सोनाली हे आईचे नाव असल्याचे अमजदखान यांनी सांगितले. खान आणि परशुराम गुरखुदे यांनी मृत मुलीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून शनिवारी सर्व सोपस्कार पार पाडले. यावेळी मृत मुलीच्या दोन्ही मावशा, त्यांचे पती व इतर दोन नातेवाईक हजर होते, असे अमजदखान यांनी सांगितले.

मृत पूजाला लहानपणापासूनच मिरगी (फिट्स) येण्याचा आजार होता. रस्त्यावर खेळ मांडून उपजीविका करणाऱ्या समाजातील सोनालीची परिस्थिती दोनवेळचे जेवण मिळण्यासारखीही नाही. गुरुवारी रात्री पूजा झोपली ते सकाळी उठलीच नाही. ती उठेना म्हणून सोनाली पूजाला घेऊन जिल्हा रुग्णालयात आली. तेथे डॉक्टरांनी पूजाला मृत घोषित केले. पूजाला मृतावस्थेत आणल्यामुळे शवविच्छेदन करावे लागणार होते. तेव्हा शवविच्छेदन विभागाजवळील एका पोलिसाजवळ बोलताना सोनाली म्हणाली, साहेब आपल्याजवळ चहा प्यायला छदाम नाही तर पोरीची मूठमाती करायला कुठून पैसा आणू.” ही माहिती पूजावर अंत्यसंस्कार करणारे अमजदखान यांनी दिली. 

पूजाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आपण व आपले सहकारी परशुराम गुरखुदे यांनी उचलली. अंत्यसंस्कारावेळी पूजाची आई नव्हती, पण इतर मोजकेच नातेवाईक होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला होता. त्या नातेवाईकांकडेही उत्तर विधीसाठी पैसे नव्हते. उलट त्यांनाच परत जाण्यासाठी पैसे द्यावे लागले. – अमजदखान.