शिवसेनेतील ‘दादा’सेना संपविण्याची गरज निर्माण झाली आहे. व्यक्तिनिष्ठा जपणाऱ्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना बदलण्याची गरज आहे. संघटनेवरची पकड ढिली पडत चालल्याचा दावा करीत खासदार चंद्रकांत खरे यांनी शिवसेनेतील अंतर्गत लाथाळयांकडे लक्ष वेधले. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा व देवळाई प्रभागांत शिवसेनेला सपाटून मार खावा लागला. या पाश्र्वभूमीवर खैरे यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव न घेता टीका केली. मात्र, पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि महापालिकेतील सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्याकडे त्यांच्या टीकेचा रोख होता. दक्षता नियंत्रण समितीच्या बैठकीनंतर खैरे पत्रकारांशी बोलत होते.
सातारा व देवळाई येथील प्रभाग निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवावर बोलताना खरे यांनी ‘दादा’ सेना संपविण्याची गरज असल्याचे सांगत शिवसेनेत तातडीने संघटनात्मक बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले. हे बदल करण्याविषयी पक्षप्रमुखांबरोबर चर्चा केली असल्याचा दावा करीत खरे म्हणाले, की हे बदल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी होतील. संघटनेवरील निष्ठेऐवजी व्यक्तिनिष्ठेला खतपाणी घातले जात आहे. पोटनिवडणुकीतील पराभवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा चालू न देणाऱ्या सेनेतील मोठय़ा पदाधिकाऱ्यावरील नाराजी कारणीभूत असल्याचे सांगितले. या पदाधिकाऱ्याचा तिरकसपणे ‘मोठ्ठा’ असा उल्लेख करीत त्याला प्रचारापासून लांब ठेवावे, अशी सूचना जिल्हाप्रमुख दानवे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांना लेखी पत्र देऊन जिल्हाप्रमुखांनी जबाबदारी सोपवली. या पोटनिवडणुकीसाठी व्यवस्थित नियोजन केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या स्थापनेपासून काम असून अलिकडेच संघटनेत येऊन कोणी शहाणपणा करणार असेल तर सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पालकमंत्री कदम यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीका केली. केवळ भाषण करण्याने जागा निवडून येत नसतात, हे सांगण्यासाठी त्यांनी शिवसेनेतील नेते विलास भानुशाली यांचे उदाहरणही दिले. या पोटनिवडणुकीत असे खटकणारे भाषण कोणाचे, असे विचारताच, ते सांगण्याची आवश्यकता नाही, लोकांना समजते, असे ते म्हणाले. हा टीकेचा रोख पालकमंत्री कदम यांच्याकडे होता का, असे म्हणताच खरे यांनी स्मितहास्य केले.
महापालिका निवडणुकीत कमी जागा मिळाल्या. काहींनी बंडखोरी केली. पक्षाविरोधात काम केले. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन प्रभागांतील निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत लाथाळ्यांवर खरे यांनी केलेले भाष्य शिवसेनेतील खदखद सांगणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा