औरंगाबाद : महापालिकेच्या सत्तापटावर शिवसेना- भाजपचे कारभारी नेहमी कुरघोडीचा डाव मांडतात. अधूनमधून ते बडय़ा नेत्यांना या खेळात ओढतात. सध्या हरिभाऊ बागडे आणि खासदार खैरे हे दोघे या खेळात आहेत, आणि कुरघोडीत खासदार खैरे यांची कोंडी होत आहे. रस्ता उद्धाटनाच्या कार्यक्रमात हरिभाऊंनी पुन्हा खासदार खैरे यांना सुनावले. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना काम करायला मोकळा हात द्या, असे ते म्हणाले. त्यावर खैरे यांनी उत्तरही दिले. मात्र, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांना बोलण्याची संधी देऊन शिवसेनेचा कारभार ढिसाळ कसा, हे भाजपच्या नेत्यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला. शहरातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षांपूर्वी शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता. पण हा निधी कुठे खर्च करायचा, कोणत्या वॉर्डातले रस्ते करायचे यावरून भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यात एकवाक्यता नव्हती. परिणामी रस्त्यांची यादी काही लवकर ठरली नाही. मग नेहमीप्रमाणे निविदा काढतानाचे घोळ झाले. सवयीने प्रकरण न्यायालयात गेले. सारे काही अडकून बसले. महापौरांनी पुढाकार घेऊन कंत्राटदाराची मिन्नतवारी केली,आणि रस्ता निविदेची प्रक्रिया सुरू झाली. सरकारी पद्धतीने हळुहळू निधी खर्चाची गती कासवाशी बरोबरी करू लागली.अखेर रस्त्यांच्या कामांना गुरुवारी मुहूर्त लागला. तत्पूर्वी निधीचे श्रेय घेण्यासाठी आणि तुमच्यापेक्षा मी बरा, असे सांगण्यासाठी भाजप-सेनेच्या नेत्यांमध्ये स्पर्धा लागली. केलेली विकास कामे शिवसेनेमुळे घडली आहेत, असा संदेश जावा म्हणून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शहर बस सेवेच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. शिवसेना नेत्यांची तारीख आधी घेतली गेली आणि मग मुख्यमंत्र्यांची तारीख घेण्यासाठी महापौर गेले. इथून कुरघोडीला सुरुवात झाली. शेवटी सेना नेत्यांनी माघार घेतली आणि रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे ठरले. तत्पूर्वी शहर बससेवेचा प्रारंभ युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी बाजार समितीतील जागेच्या व्यवहारात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप खासदार खैरे यांनी केला होता. त्याला सडेतोड उत्तर देताना हरिभाऊंनी खासदार खैरे यांना न्यायालयात जा, असे तर सुनावलेच वर ते असेही म्हणाले की कागदपत्रांशिवाय भाजपचा नगरसेवकही आरोप करीत नाही. टीका करण्याची ही पातळी नगरसेवकापेक्षाही खालच्या दर्जाची असल्याचे सांगितले. महापालिकेच्या कारभारात शिवसेनेचे पदाधिकारी कसे कमी पडत आहेत हे त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर सुनावले. राज्य सरकारने दिलेली रक्कम खर्च करता येत नाही, वसुली नीट होत नाही, कामे पूर्ण होत नाहीत असे असताना खासदार खैरे लहान- सहान गोष्टीत लक्ष घालतात, नाक खुपसतात अशी हरिभाऊंची टीका होती. रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातही खासदार खैरैं यांच्यावर टीका होईल, या भीतीने आधी हरिभाऊ बागडे यांनी बोलावे आणि नंतर खासदार खैरे यांनी बोलावे, अशी रचना करण्यासाठी शिवसेनेला निमंत्रण पत्रिकेत कसरती कराव्या लागल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार खैरे यांच्याकडे असावे, यासाठी खूप शक्ती खर्च करण्यात आली. मात्र, तरीही खासदार खैरे यांची करायची तेवढी कोंडी भाजपने केली.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात रस्त्यांसाठी निधी नसल्याचे कारण देत हा कार्यक्रम उधळून लावू असे म्हणणाऱ्या आमदार इम्तियाज जलील यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले त्यांना भाषणाची संधी दिली गेली त्यांनीही त्यांनीही भाजपच्या नेत्यांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीफ करत शिवसेनेवर टीका केली. काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनी महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. या टीकेचा सूर हरिभाऊंच्या भाषणाने पुन्हा उंचावला. खासदार खैरे हे महापालिकेच्या कारभारात अधिक लक्ष घालतात. त्यांनी महापौर-उपमहापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांना मोकळ्या मनाने काम करू द्यावे , असा सल्ला बागडे यांनी दिला. आणि पुन्हा एकदा खासदार खैरे यांची कोंडी झाली. ते भाषणाला उभारले तेही बचावात्मक सुरात. नेहमीच्या मागण्या आणि महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्याची कारणे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. टंगलटवाळी करण्यात अर्थ नसतो, असे ते म्हणाले खरे. पण या कार्यक्रमात सभेच्या ठिकाणी नागरिकांनीही खासदार खैरे यांना जाब विचारला. २०वर्षांत काय केले, असेही कोणीतरी ओरडले. त्यामुळे रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमात खासदार खैरे यांचे पुन्हा कोंडी झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून केल्या जाणाऱ्या कोंडीतून सुटका कशी करून घ्यायची असा पेच खासदार खैरे यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
समांतरचा पेच कायम
समांतर पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली त्याला मदत करु असे मुख्यमंत्र्यांनी ही सांगितले.मात्र, ही योजना पुढे कशी न्यायचे हे अजूनही स्पष्टच आहे. यावर पुन्हा एकदा आता बैठक होणार आहे. पुन्हा एकदा खासदार खैरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच केला. मात्र , या गावाचे नाव शासकीय पातळीवर बदलले जाईल यावर ते काही बोलले नाहीत. उलट शहरातील दंगली, उद्योगांवर झालेले हल्ले यामुळे बिघडत चाललेल्या वातावरणावर मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.
मागण्यांची जंत्री
काम न करता आणि स्वतच्या कितीही चुका झाल्या तरी नव्याने निधी मागण्यासाठी आनमान करायचा नाही, याचे शिक्षण औरंगाबाद महापालिकेत प्रत्येक नगरसेवकाला मिळतेच. त्यामुळे आपण किती रुपयांच्या मागण्या करतो आहोत, त्या मान्य होतील का याचा विचार न करता आपल्याला हवे तेवढे मागायला हवे, असा असा दंडक असल्यासारखे महापौरांनी मागण्या रस्तेबांधणीसाठी आणखी निधी द्या, पुतळ्याची उंची वर उंची वाढविण्यासाठी रक्कम द्या, अशी मागणी केली. कधी पाच कोटी म्हणत तर कधी दहा कोटी अशी रक्कम वाढवत नेत महापौरांनी सातारा देवळाई या शहरालगत असणाऱ्या नवीन भागाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
भाजयुमोच्या राफेलवर १०० सभा
रस्ते कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे वातावरण निर्माण केले होते. ‘लक्ष्य-२०१९’ असे नाव देत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमात राफेल प्रकरणात भाजप आक्रमक प्रचार करेल, असे संकेत देण्यात आले. राफेलप्रकरणी १०० सभाही घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच मुख्यमंत्री चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या ४० लाखाहून अधिक क्रीडापट्टना जोडून घेण्याचीही योजना भाजपने तयार केली आहे. एका बाजूला संघटनात्मक शक्ती वाढविताना मित्रपक्षातील प्रमुख नेत्यांची कोंडी करण्याचा पद्धतीशीर प्रयत्न जाहीर सभेतून करण्यात आला. यात खासदार खरे यांची कोंडी झाली.