छत्रपती संभाजीनगर : देवगिरी किल्ल्यामधील वणवे रोखण्यासाठी अग्निशामक यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. त्यासाठी वाळलेले गवत नियमितपणे काढण्यापासून ते किल्ल्यावर आग विझविण्यासाठी कोठे पाणी साठवणूक करावी याचे नियोजन करण्याच्या सूचना भारतीय पुरातत्त्व विभागास कराव्यात व वारंवार लागणाऱ्या वणव्यांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदार सुळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.
देवगिरी किल्ल्याचे जतन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. दर वर्षी देवगिरी किल्ल्यातील काही भागांत वणवा पेटतो. मात्र, त्याचे स्वरूप तसे मोठे नसते. या वर्षी काही ऐतिहासिक वास्तूंपर्यंत आगीचा भडका उडाला. तसेच या भागातील मोर, सरपटणारे प्राणी यांनाही इजा झाली. हे प्रकार थांबवण्यासाठी स्वतंत्रपणे काम करणारी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. किल्ल्यातील वणव्याच्या घटना रोखण्यासाठी काही उपाययोजना भारतीय पुरातत्त्व विभागाने कराव्यात, अशी मागणी इतिहासप्रेमी तरुणांनी केली आहे.
किल्ल्यावर विविध ठिकाणी उगवणारे गवत अलीकडच्या काळात ऐतिहासिक वास्तूंची हानी होईल एवढे वाढते. त्याची सफाई होत नाही. दर वर्षी उन्हाळ्यापूर्वी त्याची साफसफाई करण्याची कार्यपद्धती ठरविण्याची गरज आहे. तसेच असा वणवा लागला, तर पाणी कोठे साठवून ठेवल्यास आगीवर नियंत्रण मिळवता येईल याचाही आराखडा करण्याची गरज असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी पत्रातून व्यक्त केले आहे.
याशिवाय पर्यटकांकडील आगपेटी व सिगारेटसारखे ज्वालाग्राही पदार्थ किल्ल्याबाहेरच काढून घ्यावेत. किमान वीस प्रशिक्षित सुरक्षारक्षकही किल्ल्यावर नियुक्त करावेत, त्यांनी सुरक्षेच्या अनुषंगाने गस्त घालावी, पुरातत्त्व विभागातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वास्तू जपाव्यात, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.