छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी क्रांती चौकात ठिय्या मांडून आंदोलन केले. तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही स्टुडण्टस फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी विधी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तारीख, परीक्षा व मूल्यमापन विभागाने अचानक बदलल्याच्या विरोधात आवाज उठवला. यासंदर्भाने परीक्षा नियंत्रकांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर टोलवाटोलवी केल्याचा आरोप केला.
क्रांती चौकात बुधवारी सकाळी महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा देणारे शेकडो विद्यार्थी एकत्र आले होते. हो किंवा नाही सदरात बसणाऱ्या उत्तराच्या प्रारुपातील शेवटची २०२४ ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलून यामधील कायदेशीर व तांत्रिक त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी यावेळी केली. हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, या पार्श्वभूमीवर बुधवारी आंदोलन करण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
आयोगाच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना १५ दिवसांहूनही अधिक वेळ वाया गेलेला आहे. तसेच निकाल सुधारित करण्यासाठी पाठपुरावा करणे व कायदेशीर बाबींसाठी १५ दिवसांहूनही अधिक वेळ वाया गेलेला आहे. असा मिळून सुमारे एक महिन्याचा वेळ वाया गेलेला असून, वरील परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
विद्यापीठात एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी विधी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेची तारीख बदलण्याच्या निर्णयामुळे ताण वाढल्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. निवेदनात म्हटले आहे की, विधी अभ्यासक्रमातील परीक्षा या परिपत्रकानुसार ६ मे ला होणार असताना अचानकपणे विद्यापीठाने २२ एप्रिल रोजी घेण्याचे परिपत्रक काढले आहे. चार दिवसाआधीच परीक्षा येऊन ठेपल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर ताण दुप्पटचा वाढला आहे. ११ मार्चला विद्यापीठाने विधी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा संदर्भात परिपत्रक काढले होते. या निर्णयाविरोधात एसएफआयच्या विद्यापीठ समितीकडून परीक्षा नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. जेव्हा विद्यार्थी चर्चा व निवेदन देण्यासाठी कुलगुरू, प्र-कुलगुरू व परीक्षा नियंत्रकांकडे गेले तेव्हा विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारामधून आत जाऊ दिले नाही तसेच कुलूपही लावण्यात आले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. निवेदनावर जिल्हा अध्यक्ष मनीषा बल्लाळ, विद्यापीठ अध्यक्ष सूरज देवकरसह ३० विद्यार्थ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.