वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे एका साधूने आठ वर्षांच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने साधूवर हल्ला केल्याने त्याचाही मृत्यू झाला. ही घटना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. गुप्तधनापोटी मुलाला मारले असावे, असा गावकऱ्यांचा संशय आहे. मृत मुलाचे नाव महेश उगले, असे आहे. या घटनेनंतर औरंगाबाद ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपविभागीय अधिकारी हर्ष पोतदार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घटनास्थळाला भेट दिली. मात्र मुलाचा खून कोणत्या कारणाने झाला, याबाबत साशंकता असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या घटनेमुळे वैजापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
दहेगाव येथे काही वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशातून एक साधू राहण्यासाठी आला होता. माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या संपर्कातही तो होता. त्यांच्याच निवासस्थानाजवळ त्याने कुटी बांधली होती. मात्र, त्याची लक्षणे चांगली नसल्याने त्याला हाकलून दिल्याचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनी सांगितले. या महाराजाचे नाव मात्र पोलिसांनीही सांगितले नाही. दीड वर्षांपूर्वी दहेगावमधून हाकलून दिल्यानंतर तो अन्यत्र फिरला आणि नंतर पुन्हा त्याला गावकऱ्यांनी आश्रय दिला होता. उगले यांच्या शेतातच त्याने कुटी बांधली होती आणि बऱ्याच जणांना गुप्तधन काढून देतो, असे आमिषही त्याने दाखवले होते. आज दुपारच्या सुमारास आठ वर्षांच्या महेश उगले याचा साधूने कुऱ्हाडीने खून केला. ही घटना गावकऱ्यांना कळल्यानंतर जमाव संतप्त झाला आणि त्यांनी साधूला बेदम मारले. या मारहाणीत साधूचा मृत्यू झाला आहे. घडलेला प्रकार पोलिसांना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कळाला. तेव्हापासून नक्की कोणत्या कारणामुळे ही घटना घडली, याचा पोलीस शोध घेत आहेत. मोबाईलच्या कारणामुळे साधू आणि मुलामध्ये वाद झाल्याची चर्चा वैजापूरमध्ये होती. रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबतचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Story img Loader