छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यावर नाना प्रकारे टीका करणाऱ्या अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मुस्लिम मते वळविण्यात एमआयएमच्या नेत्यांना अपयश आल्यानंतर ‘एमआयएम’च्या नेत्यांना अडचणीत आणता येईल अशी व्यूहरचना करण्यासाठी वंचितने मुस्लिम उमेदवारास पुढे केले असल्याचा कयास बांधला जात आहे. वंचितने स्वतंत्र उमेदवार देण्यापूर्वी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ‘आनंदराज आंबेडकर’ यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर भोजन केले. अमरावती मतदारसंघात त्यांच्यासाठी सभाही घेतल्या जातील असे आता सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद लोकसभेचे राजकारण बहुपेढी. हिंदू- मुस्लिम, मराठा- ओबीसी असे मतविभाजनाचे प्रयोग या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. या वेळी वंचितने मुस्लिम उमेदवार दिल्याने मुस्लिम मताचे विभाजन होण्याची शक्यता दिसून येत आहे. ‘एमआयएम’च्या विजयात वंचित मतांचा मोठा वाटा होता हा वंचित नेत्याचा दावा ‘एमआयएम’ने जाहीरपणे कधी नाकारला नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी नेहमी आदरार्थी उल्लेख होईल, असे प्रयत्न आवर्जून केले जात. मात्र, युतीची दारे आता पूर्णत: बंद झाली आहेत असे लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी आनंदराज आंबेडकरांबरोबर सूर जुळवून घेतले. केवळ मुस्लिम मतांच्या आधारे विजय मिळणार नाही, ही बाब मुस्लिम नेत्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे मुस्लिम मतांमध्ये विभाजन व्हावे आणि जलील यांच्या विरोधातील मतेही वळवता येतील असा अफसर खान यांना उमेदवारी देण्याबाबतचा होरा असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – नफ्यापेक्षा दुप्पट रोखे दान; आठ कंपन्यांचा प्रताप
जालना लोकसभा मतदारसंघात वंचितने आवर्जून उमेदवार दिला आहे. नांदेडमध्ये अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिली असून ते लिंगायत जातीचे आहेत. बसव बिग्रेड नावाची ते संघटनाही चालवतात. नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीमध्ये उतरणारे प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार मराठा असून विरोधी मतांचे विभाजन झाले तर त्याचा लाभ भाजपला होऊ शकतो, असे गणित घातले जात आहे. परभणीतील वंचितचा उमेदवार राजकीय पटलावर नवखा असल्याचे सांगण्यात येत आहे. विविध जात समुहाला उमेदवारी देत आहोत, असा संदेश वंचितने उमेवार निवडीतून दिला आहे. औरंगाबादमधील उमेदवार निवडीमध्ये जलील यांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीस वंचितने प्राधान्य दिल्याचा संदेश दिला आहे.