उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीची पहिलीच जाहीर सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी संध्याकाळी पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर आणि भाजपावरही परखड शब्दांत हल्लाबोल केला. सभेतील भाषणांचे पडसाद आज दिवसभर राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत असताना तिकडे संभाजीनगरमध्ये मात्र काही भाजपा कार्यकर्त्यांनी ‘मैदान शुद्धीकरणा’चा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.

रविवारी संध्याकाळी मविआची सभा पार पडली. आधी सभेतून मविआच्या नेतेमंडळींकडून आरोप आणि त्यानंतर आज दिवसभर भाजपा आणि शिंदे गटातील नेतेमंडळींकडून त्यावर प्रत्यारोप असा राजकीय कलगीतुरा सध्या राज्यात रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच संभाजीनगरमधील ज्या मैदानावर महाविकासआघाडीची सभा झाली, तिथेच गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न झाल्यामुळे त्यावरूनही पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

नेमकं काय घडलं?

रविवारची सभा झाल्यानंतर सोमवारी दुपारी काही स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सभेच्या मैदानावर गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात या कार्यकर्त्यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. “बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र चरणांनी हे मैदान पवित्र झालंय. त्यांची आम्हाला शिकवण होती की राष्ट्रवादी आणि काँग्रेस पूर्णपणे गाडली पाहिजे. याच विचारावर आम्ही आजपर्यंत काम करत आलो. त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घेऊन उद्धव ठाकरे इथे सभा घेत असतील तर हे मैदान अपवित्र झालंय”, असं त्यातल्या एका कार्यकर्त्याने सांगितलं.

नाना पटोले मविआच्या सभेला का आले नाहीत? नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांचा खुलासा; म्हणाले, “त्यांच्याशी बोलताना जाणवलं की…”

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन इथे सभा घेतली. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांचे अपवित्र पाय इथे लागले आहेत. ते मैदान आम्ही शुद्ध करण्याचं काम करतोय. १९८८ साली बाळासाहेब ठाकरेंनी याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरून हिंदुत्वाची घोषणा दिली होती. पण काल वज्रमूठ सभेच्या माध्यमातून हे मैदान अपवित्र झालं आहे. हे मैदान गोमूत्र शिंपडून ते पवित्र करणार आहोत. याच ठिकाणी हिंदुत्वाचा नारा देऊन छत्रपती संभाजीनगर हे नाव पुढे नेणार आहोत”, असंही त्यांचं म्हणणं होतं.

Story img Loader