Gunratna Sadavarte Car Attack Marathi News : गुणरत्न सदावर्ते मराठाविरोधी भूमिका घेत असल्याने परळ येथील क्रिस्टल टॉवरखाली असलेल्या त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. छत्रपती संभाजी नगर येथील मंगेश साबळे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडण्यात आली. याप्रकरणी मंगेश साबळेला अटक करण्यात आली आहे. तर, याप्रकरणी मंगेश साबळेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
मंगेश साबळेच्या आई म्हणाल्या की, “माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाहीय. तो समाजासाठी लढतोय. त्याला न्याय दिला पाहिजे. गाड्या फोडणे हा मोठा गुन्हा नाही. सरकार आरक्षण देत नाहीय, त्यामुळे माझ्या मुलाने हे पाऊल उचललं आहे. मी त्याचं समर्थन करते.”
हेही वाचा >> “गुणरत्न सदावर्तेंची कार फोडणाऱ्यांविषयी आम्हाला आदर, कारण..”, कुठल्या नेत्याने केलं वक्तव्य?
“मराठा समाजासाठी तो गेल्या दोन – तीन वर्षांपासून उपोषण करतोय. समाजासाठी लढतोय”, असं सांगताना त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले. “माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. तो समाजासाठी लढतो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. त्याने मोठा गुन्हा केला नाहीय, त्याला सोडून द्यावं”, अशी विनंतीही माऊलीने सरकारकडे केली आहे.
दरम्यान, मंगेश साबळे यांनी याआधीही अशी अनेक कृत्ये केली आहेत. २ सप्टेंबर रोजी त्यांनी त्यांची कार पेटवली होती. याचेही पडसाद राज्यभर उमटले होते. याविषयी मंगेश साबळे यांच्या आईला विचारले असता त्या म्हणाल्या की, “आमची घरची परिस्थिती नाजूक आहे. पण तो सर्व समाजासाठी करतो. समाजासाठी त्याने फार मोठं पाऊल उचललं आहे.”
हेही वाचा >> “गाडी फोडण्याची शिक्षा कमी, सदावर्तेंना संपवायला हवं होतं, कारण…”; संजय गायकवाडांचं वादग्रस्त वक्तव्य
कोण आहे मंगेश साबळे?
मंगेश साबळे हे मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते आहेत. ते मूळचे संभाजी नगर येथील असून फुलंब्री तालुक्यातील सरपंच आहेत.