नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी ३४४ हेक्टर भूसंपादन आता बाजारभावाप्रमाणे होणार आहे. या पूर्वी १ हजार १६५ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले. त्याचा ताबाही रेल्वे प्रशासनाकडे देण्यात आला. केंद्र सरकारच्या नव्या कायद्यान्वये ही प्रक्रिया हाती घेतल्याने एप्रिलनंतर रेल्वेच्या कामाला सुरुवात होऊ शकते, असा महसूल प्रशासनाचा अंदाज आहे. २४१ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी १२८ गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग तातडीने करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. दिवंगत खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघातील ही मागणी पूर्ण केली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याच विभागाला हालचाल करणे शक्य नव्हते. या प्रक्रियेला वेग देण्यात आला. पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त महेंद्र हरपाळकर म्हणाले, की १ हजार ५३८ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. पैकी १ हजार १६५ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले. उर्वरित जमिनीचे संपादन रेडी रेकनर व बाजारभाव यात २५ टक्के अधिक रक्कम देऊन कार्यवाही पूर्ण केली जाईल. बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे ठरविले आहे.
शेतकऱ्यांकडून ही जमीन संपादित करण्यात आली असली, तरी वाढीव मोबदला घेण्यासाठी त्यांना न्यायालयात जाता येणार आहे. संपादनाची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने लवकरच कामाला सुरुवात होऊ शकते, असे सांगितले जात आहे. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी आता हे काम पूर्ण करण्यासाठी गती दिली आहे.

Story img Loader