पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी संध्याकाळपासून कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा सुरू केली आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांकडूनही पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पंतप्रधान मोदींच्या ध्यान करण्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील पाणी टंचाईवरून शिंदे सरकारलाही लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा – डीन काळे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेतल्याने पॉर्शे अपघात प्रकरणाला वेगळे वळण – नाना पटोले
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. यादरम्यान, त्यांनी टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेवर खोचक शब्दांत टीका केली. पंतप्रधान मोदींनी आता कायम ध्यानधारणा करावी, असे ते म्हणाले. तसेच आता निवडणुकीचा प्रचार संपला असून त्यांनी काय करावं, हा त्यांचा मुद्दा आहे, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली.
याशिवाय आज माध्यमांमध्ये मोदी इथे आहेत, उद्या तिथे आहेत, हे दिवसभर दाखवलं जात आहे. ही गंभीर बाब आहे. आज जनतेचे अनेक प्रश्न आहेत. महागाईने लोक त्रस्त झाली आहेत. बेरोजगारी आहे. लोकांना पिण्याचं पाणीही मिळत नाही. आमच्यासाठी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, असंही नाना पटोले म्हणाले.
पाणी टंचाईवरून शिंदे सरकारवर टीका
यावेळी बोलताना त्यांनी दुष्काळाच्या मुद्यावरून शिंदे सरकारलाही लक्ष्य केलं. आज राज्यातील जनता तहानलेली आहे. मात्र, राज्य सरकार आपल्याच मस्तीत आहे. कोणी सुट्टीवर आहे, तर कोणी विदेशात गेलं आहेत. संभाजीनगर विभागात आज हजारो टॅंकरने पाणीपुरवठा होत असल्याचे कागदोपत्री दिसत आहे. मात्र, टॅंकरमाफीया सुद्धा तयार झाला आहे. प्रशासन आणि सरकार या दोन्हीच्या संगनमताने जनतेच्या पैशाची लूट चालली आहे, अशी टीका त्यांनी केली.
आज राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज जनतेला पिण्याचे पाणी नाही. जनावरांसाठी चारा नाही. अशा संकटाच्या वेळी आचारसंहितेच्या नावखाली जनतेला तफडत ठेवायचं ही कुठली आचारसंहिता आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. आज सरकार म्हणते की आचारसंहिता आहे. त्यामुळे निर्णय घेता येत नाही. मात्र, लोक जगवणे महत्त्वाचे आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – Porsche Accident:”पोर्श प्रकरणात आमदाराच्या मुलाचा समावेश, पब पार्टीनंतर रेस..”, नाना पटोलेंचा आरोप
४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार बनेल
पुढे बोलताना देशात ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत इंडिआ आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, त्यामुळे येत्या ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार बनेल, असे ते म्हणाले.