नांदेड : जुन्या भांडणावरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या एका हातात उघडी तलवार व दुसऱ्या हातात खंजर पाहून गुरुद्वारामधील पुजारी हरदीपसिंह ऊर्फ रज्जुभैय्या गुलाबसिंह पाठी यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुद्वारा गेट क्र. ५ शहीदगंज येथे रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर धमकी देणारा शेरूसिंह नानकसिंह गिल याला गोळीबार करून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पकडले.
हेही वाचा : श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा : विश्व हिंदू परिषदेतर्फे घरोघरी ‘भाव जागरण’
शेरूसिंह गिल याला त्याच्या मावस बहिणीच्या पतीच्या भावाचा निर्घृण खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. तो नाशिक येथील तुरूंगात शिक्षा भोगत असताना करोना महामारीच्या काळात शासनाने काही गुन्हेगारांना अटी-शर्तींवर काही दिवस बाहेर सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फायदा घेऊन बाहेर आला होता. तेव्हापासून तो पेहराव बदलून वावरत होता. रविवारच्या घटनेनंतर आरोपीने घरातील गॅस सिलेंडर लिक करून स्फोट घडविण्याची धमकी पोलिसांना दिली होती.