नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत करण्यात आले. या पदयात्रेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, गिरीश कदम, अजितपालसिंग संधू, क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, व्यंकटेश चौधरी, चंदा रावळकर, यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. तसेच नांदेड जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून या पदयात्रेस प्रारंभ झाला. चिखलवाडी कॉर्नर, तहसील कार्यालय, अण्णाभाऊ साठे पुतळा, आयटीआय चौक, शिवाजीनगर आणि वजिराबाद चौक या मार्गाने ही यात्रा पार पडली. समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
शेकडो विद्यार्थी, खेळाडू, एनसीसी, एनएसएस, विविध क्रीडा संघटनांचे सदस्य, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. महानगर पालिका उपायुक्त गिरीश कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा प्रशासनाचे मान्यवर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहर आणि जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या भागात अनेक कार्यक्रम पार पडले. शहर आणि सबंध जिल्ह्यात वेगवेगळ्या उपक्रमांतून शिवप्रेमींची सद्भावना दिसत असताना दुसरीकडे शहरातल्या काही मुख्य रस्त्यांवर दुचाकीवीर टोळक्यांनी पोलीस प्रशासनाचे आदेश धुडकावून लावत हैदोस घातल्याचेही दिसून आले. शहरातील विविध महाविद्यालये, अन्य संस्था आणि संघटनांनी जयंतीनिमित्त महाराजांच्या शौर्यगाथेचे स्मरण केले.