पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी सकाळी श्री क्षेत्र नारायणगडाला भेट दिली. मात्र, गडाचे महंत शिवाजीमहाराज आणि एकही विश्वस्त हजर नसल्याने समाधीचे दर्शन घेऊन त्या परतल्या. अंतर्गत वादामुळे भगवानगडापाठोपाठ नारायणगडावरही महंतांच्या नाराजीला सामोरे जावे लागल्याने मुंडे समर्थकांमधून संताप व्यक्त होत आहे.
बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगड येथे नगद नारायण महाराजांची द्विशताब्दी पुण्यतिथी आणि महंत शिवाजीमहाराज यांचा एकसष्ठी सोहळा २० मार्चला आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले होते. मात्र, या कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांसह सर्वानीच पाठ फिरवली. स्थानिक पातळीवर आमदार मेटे व पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वादामुळे जिल्ह्यातील भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांचा तर अघोषित बहिष्कारच दिसला.
या पाश्र्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच शुक्रवारी नारायणगडावर जाऊन महंत शिवाजीमहाराजांचे अभीष्टचिंतन करणार असल्याचे जाहीर करून भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. नियोजित दौऱ्यानुसार सकाळी साडेनऊच्या सुमारास मंत्री मुंडे, आमदार आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नारायणगडावर पोहोचले. मात्र, गडावर महंत शिवाजीमहाराज यांच्यासह संस्थांनाचा एकही विश्वस्त हजर नव्हता. त्यामुळे नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन मंत्री पंकजा मुंडे या पौंडुळकडे रवाना झाल्या.
डिसेंबर महिन्यात गोपीनाथगडाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी भगवानगडावरुन पंकजा मुंडे यांचे राजकीय भाषण होणार नाही, असा निर्णय जाहीर केला. महंत नामदेवशास्त्री यांच्या निर्णयानंतर मुंडे समर्थकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, तर पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन महंत शास्त्री यांची भेट घेतली तरी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या पाश्र्वभूमीवर नारायणगडाच्या पुण्यतिथी कार्यक्रमालाही अंतर्गत राजकीय वादामुळे मंत्री मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळे महंत व विश्वस्तांनीही गरहजेरी लावून नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे. जिल्ह्याच्या राजकारणात धार्मिक गडांना महत्त्व आहे. प्रत्येक गडाला एखाद्या नेत्याचा राजाश्रय राहिला आहे. पण मागील काही महिन्यांपासून आता धार्मिक गडावरुनच राजकारण गडगडू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा