राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर ‘दारूवाली बाई’ अशा शब्दांत केलेल्या टीकेच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकत्रे आक्रमक झाले. शनिवारी दिवसभर गावागावांत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मलिक यांचे पुतळे जाळले. शहरातील राष्ट्रवादी भवनासमोर कार्यकर्त्यांनी मलिक यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाला जोडे मारून दहन केले. तर पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करून गुन्हे नोंदविण्याची मागणी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
टीकेच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी परळीत भाजप कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करून पुतळा जाळला. शनिवारी जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी नवाब मलिक यांनी महिला मंत्र्यांविरुद्ध टीका करताना पातळी सोडली असून, ते मनोरुग्ण असल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ उपचार करावा. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या महिला सक्षमीकरणासाठी राज्यभर फिरत असताना त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते महिला मंत्र्यांविषयी अपशब्द वापरत आहेत. महिलांना सन्मान देण्याची हीच का राष्ट्रवादीची संस्कृती, असा प्रश्न अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम जहाँगीर यांनी केला. सकाळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या समोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाला लटकवून जोडे मारत पुतळय़ाचे दहन केले. या वेळी माजी आमदार आदिनाथ नवले, तालुकाध्यक्ष चंद्रकांत फड, दादासाहेब मुंडे, भगीरथ बियाणी, संदीप उबाळे, स्वप्नील गलधर, राजेंद्र बांगर, विक्रांत हजारी, सुनील मिसाळ आदी कार्यकत्रे होते. माजलगावमध्ये शिवाजी चौकात भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुतळय़ाचे दहन केले. केजमध्ये भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संतोष हांगे, हारुण इनामदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुतळय़ाचे दहन करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेवराईत आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयापासून मोर्चा काढत शिवाजी चौकात तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. परळीत तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली धारूरमध्ये स्वरूपसिंह हजारी तर वडवणीत दिनकर आंधळे, प्रा. सोमनाथ बडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यासह जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये नवाब मलिक यांच्या पुतळय़ाचे दहन करत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा