मिनी मंत्रालय मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्षनेतृत्वाने उमेदवारीचे संकेत दिल्यानंतर अनेकांनी आपापल्या गटात ‘मुहूर्त’ शोधून गाठीभेटींनाही सुरुवात केली आहे. सध्याची जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्याचे राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान तर आहेच, पण आगामी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी वगळून सगळे एकत्र येण्याची शक्यता दिसू लागली आहे. अन्य राजकीय पक्षांच्या हालचाली पाहू जाता राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत एकटे पाडण्याचेही प्रयत्न होतील, अशाच घडामोडी घडताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीला बाजूला करून सत्तेसाठी सर्व जण एकत्र येतात, तेव्हा या प्रक्रियेला गेल्या पाच वर्षांत ‘गंगाखेड पॅटर्न’ असे नाव देण्यात आले होते. राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेससह शिवसेना, भारतीय जनता पक्ष अशा सर्वानी एकत्र यायचे असा हा ‘पॅटर्न’ आहे. मावळत्या जिल्हा परिषदेत राजेश विटेकर अध्यक्ष तर राजेंद्र लहाने उपाध्यक्ष हे राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी होते. राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत सत्ता अबाधित ठेवली होती. आता ती टिकविण्याचीच कसरत पक्षाच्या नेत्यांना करावी लागणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी सध्या बारकाईने जिल्हा परिषदेच्या उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली आहे. एवढेच नाही तर अनेक ठिकाणी ‘कामाला लागा’ म्हणत कार्यकर्त्यांना तयारीलाही लावले आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, वरपुडकर यांनी आपापल्या भागात लक्ष पुरवत उमेदवारांसाठीची रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. शिवसेनेतही सध्या जोरदार पक्ष सोहळे सुरू आहेत. कार्यकत्रे भाजपपेक्षा शिवसेनेतच मोठय़ा प्रमाणावर पक्षप्रवेश करू लागले आहेत. सध्या खासदार संजय जाधव यांच्यासह आमदार डॉ. राहुल पाटील, मोहन फड आदींच्या कार्यक्षेत्रात असे कार्यकर्त्यांचे मेळावे जोरदार सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषद निवडणुकीत मोठीच कसोटी लागणार आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर हे मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडे होते. आमदार विजय भांबळे व बाबाजानी यांनी वरपुडकरांना जिल्हा परिषदेच्या सत्तेत गेल्या अडीच वर्षांत बाजूला ठेवले. वरपुडकरांनी राष्ट्रवादीत आपली उपेक्षा होत आहे हे वेगवेगळ्या अनुभवांतून ओळखून घेतले आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. एरवी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची अवस्था केविलवाणीच असते पण आता वरपुडकरांनी जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षात जान आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी पूर्णा, गंगाखेड या तालुक्यांसह जुन्या सिंगणापूर मतदारसंघात आपले लक्ष बारकाईने ठेवले आहे. या भागात अनेक गटांतले उमेदवारही त्यांनी निश्चित केल्यात जमा आहेत. सेलू-जिंतुर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचेच पक्षात चालते. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशिवाय आपल्या हिमतीवर बोर्डीकर या विधानसभा मतदारसंघातले सर्व निर्णय घेतात. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातले उमेदवारही बोर्डीकरांकडून निश्चित केले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार मोच्रेबांधणी करावी लागणार आहे.
सत्तेसाठी संघर्ष
गेल्या जिल्हा परिषदेत आमदार विजय भांबळे, बाबाजानी दुर्राणी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीला दणदणीत यश मिळवून दिले होते. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनीही दौरे सुरू केले आहेत. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेसाठी आपल्या अस्तित्वाकरिता मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आजघडीला राष्ट्रवादीकडे तीन आमदार आहेत. या सर्वानी आपली शक्ती पणाला लावली तर राष्ट्रवादीला ज्या जागा मिळतील तेवढय़ा जागांमध्ये जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता येईल काय असा प्रश्न आहे. अशा वेळी राष्ट्रवादीने जर बहुमताचा आकडा पार केला नाही तर ती या पक्षासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते. बहुमतासाठी अगदीच काही जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादीला मदतीसाठी कोणीच हात पुढे करणार नाही. कारण राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या वरपुडकरांची पुन्हा राष्ट्रवादीला मदत करण्याची इच्छा असणार नाही. जिल्ह्य़ात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस अनेकदा मांडीला मांडी लावून बसलेली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करायची वेळ आली तर काँग्रेससह शिवसेना, भारतीय जनता पक्ष, घनदाट मित्रमंडळ अशीही मोट बांधली जाऊ शकते. सत्तेच्या समीकरणात राष्ट्रवादीला एकटे पाडण्यासाठी जेवढे काही करता येईल तेवढे वरपुडकरांकडून केले जाईल. वरपुडकर व शिवसेना यांच्यात परभणी बाजार समितीच्या निमित्ताने झालेले सख्य पुढे जिल्हा परिषदेतही दिसले तर आश्चर्य वाटायला नको. प्रयत्नांची शिकस्त करून राष्ट्रवादी बहुमतापर्यंत गेली तरच या पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेवर येऊ शकते अन्यथा आघाडी करून या पक्षाला जिल्हा परिषदेवर वर्चस्व गाजविण्याची शक्यता तशी धुसरच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला एकटय़ाच्याच बळासाठी धावाधाव करावी लागणार आहे.
पक्षीय संख्याबळ
- राष्ट्रवादी २५
- काँग्रेस ८
- शिवसेना ११
- भाजप २
- शेकाप १
- रासप १
- घनदाट मित्र मंडळ ३
- अपक्ष १
- एकूण ५२