मराठवाडय़ातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार अंकुशराव टोपे ( वय ७४) यांचे रविवारी पहाटे तीन वाजता चैन्नई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर तेथे हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. माजी मंत्री राजेश टोपे यांचे ते वडील होते. सोमवारी सकाळी दहा वाजता समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंबड विधानसभा मतदारसंघाचे १९७२ ते १९७८ दरम्यान अंकुशराव टोपे यांनी नेतृत्व केले. तसेच १९९१ ते १९९९६ दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाकडून नेतृत्व केले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे ते सदस्यही होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष इत्यादी पदांवर त्यांनी काम पाहिले. जालना जिल्ह्य़ात समर्थ आणि सागर या दोन सहकारी साखर कारखान्यांची उभारणी त्यांनी केली. ५० पेक्षा अधिक शाळा आणि महाविद्यालय असणाऱ्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली. यशवंत सहकारी जिनिंग व प्रेसिंग, समर्थ सहकारी दूध संघ, समर्थ-सागर सहकारी पाणीवाटप संस्था फेडरेशन, खोलेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान जालना इत्यादी संस्थांची संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी स्थापना केली. जालना येथे मराठवाडा साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजनही त्यांनी केले होते. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे समर्थ सहकारी बँकेची स्थापनाही त्यांनी केली. जालना जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राशी गेल्या पन्नास वर्षांपेक्षा त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

Story img Loader