छत्रपती संभाजीनगर : बीडसह मराठवाड्यातून स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोडणी महिला कामगारांसाठी एक आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन द्यावी. तोडणीपूर्वी आणि नंतर त्यांची आरोग्य तपासणी करावी अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. सोमवारी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्यासह मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला.

 बीड जिल्ह्यातील महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढून घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने २०१९ मध्ये एक समिती नेमली होती. या समितीने  गेल्या तीन वर्षांत बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांबाबत तपासणी समितीने केली. या अनुषंगाने समोर आलेल्या बाबींवर शासकीय अधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने काम करावे अशा सूचनाही गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. महिलांना मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावे तसेच उसतोडणी परिसरात स्वच्छतागृह उभारणे साठी ऊस तोड कामगार महामंडळाचे १० टक्के निधीची तरतुद करावी, अशा सूचना निलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

रेशनच्या सोयीसाठी ॲप

 मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करावी तसेच  ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करुन त्यांना रेशन आहे त्या भागातून देण्याची योजना करण्याच्या सूचनाही गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

गर्भपिवशी शस्त्रक्रियाचा अहवाल दर महिन्याला

खासगी रुग्णालयात होणाऱ्या गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियांचे अहवाल खासगी रुग्णालयाने दरमहा जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवावा, असेही सांगण्यात आले असून तोडणी करणाऱ्या मजुरांचे ओळखपत्र द्यावे,  कामगारांना पिण्याचे पाणी, तात्पुरते स्वच्छतागृहे निर्माण करावीत तसेच महिला व बालकल्याण विभागाने कारखान्याच्या ठिकाणी उसतोड मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघर तयार  अशा सूचनाही गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

उसतोडणी महामंडळाकडे ११० कोटीचा निधी

उसतोडणी महामंडळाकडे गेल्या तीन वर्षाचा एकत्रित ११० कोटी रुपयांचा निधी जमा आहे. त्यामुळे ऊसतोडणी मजुराच्या गरजा लक्षात घेऊन तीन वर्षाचा एक कृती आराखडा बनविण्याच्या सूचनाही निलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

Story img Loader