लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : कर्करोगावर नवे लस संशोधन अंतिम टप्प्यात असून त्याची मानवी चाचणी सुरू झाली आहे. येत्या सात-आठ महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा ‘आयुष’ मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला.

अर्थसंकल्पाबाबत जागृतीसाठी मंत्र्यांना दिलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी मंगळवारी पत्रकार बैठक घेऊन अर्थसंकल्प आणि त्यातील आरोग्य क्षेत्राच्या तरतुदीची माहिती दिली.

कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालयात एक विशेष कक्ष उभारण्यात येणार आहे. याचबरोबर आता कर्करोग होऊ नये म्हणून लस विकसित केली जात आहे. ही लस लवकर उपलब्ध होऊ शकेल. पुढील पाच वर्षांत ७५ हजार डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून पुढील वर्षात १० हजार डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. एकूण अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी ९९ हजार ८५८. ५६ लाख कोटी रुपयांचा निधी असून यामध्ये आयुष मंत्रालयाचा चार हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे, असे प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader