‘मधु मागसी माझ्या सख्यापरी! मधुघटची रिकामे पडती जरी!’ या काव्यपंक्ती अनेकांना माहिती आहेत. वनराईचे राज्यात सर्वात कमी क्षेत्र असणाऱ्या लातूर जिल्हय़ातील तरुणाने राज्यात सर्वाधिक मध गोळा करणारा तरुण अशी मोहोर आपल्या नावावर उमटवली आहे. संपूर्ण देशभर फिरत दरवर्षी राज्याच्या मधाची गरज भागवणारे लातुरातील दिनकर पाटील यांनी तरुणांसमोर वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
चाकूर तालुक्यातील िहपळनेर गावच्या दिनकर पाटलांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर खादी ग्रामोद्योग मंडळात प्रशिक्षण घेतले. मधुमक्षिका पालन व्यवसायात यश मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. नमनालाच अपयश आले, मात्र अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे सूत्र लक्षात ठेवून त्यांनी कामाला सुरुवात केली व या क्षेत्रातील दशकपूर्ती केली. या वर्षी खादी ग्रामोद्योग मंडळासोबत वर्षभरात २५ टन मध उपलब्ध करून देण्याचा करार केला. पहिल्याच खरीप हंगामात तब्बल १५ टन मध गोळा केला.
मध गोळा करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर अशा विविध प्रांतांत ते फिरतात. प्रत्येक ठिकाणचा हंगाम लक्षात घेऊन आपल्या मधमाश्यांच्या पेटय़ांचा ताफा घेऊन भटकंती करतात. पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ खरीप हंगाम संपला, की आपल्या मेंढय़ा घेऊन जसे उर्वरित महाराष्ट्रात फिरतात त्याच पद्धतीने दिनकर पाटील आपल्या ६०० मधपेटय़ा व सुमारे १ कोटी मधमाश्यांसह भ्रमंती करतात. वर्षांत तीन हंगाम मिळतात. त्यातून ते मध गोळा करतात. या वर्षी अकोला जिल्हय़ातील दापुरा (तालुका अकोट) गावचा परिसर, तेल्लारा तालुक्यातील घोडेगाव, तर उस्मानाबाद जिल्हय़ातील डिग्गी व बेडगा परिसरात सूर्यफुलाच्या शेतात मधपेटय़ा ठेवल्या. यातून मधमाश्यांच्या साहाय्याने परागीकरण सुलभ होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते. शिवाय मधही जमा होतो. तब्बल १५ टनाच्या आसपास हा मध उपलब्ध झाला असल्याचे पाटील म्हणाले. वर्षांत मध गोळा करताना मधमाश्यांच्या वर्षभराच्या पालनपोषणाची जबाबदारीही उचलावी लागते. मध गोळा करताना त्यांचे भरणपोषण होईल व पाणी उपलब्ध होईल, याचीही काळजी घ्यावी लागते.
आता राजस्थानातील प्रतापगड भागात रब्बी हंगामातील मध गोळा करण्यासाठी ते जाणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून सातत्य ठेवून या उद्योगात त्यांनी भक्कम पाय रोवले. त्यासाठी मेंढपाळापेक्षाही अधिक कष्ट घेतले. अनेक हालअपेष्टा सहन केल्या. त्यातून ते जिद्दीने उभे राहिले. जिद्द बाळगली तर मधाचे उत्पन्न चांगले मिळते. केवळ महाराष्ट्रात उपलब्ध होणारा मध गोळा केला, तर संपूर्ण देशाला पुरवठा करता येईल व देशभर मध गोळा करण्याची यंत्रणा नीट विकसित केली तर जगाला मधपुरवठा करता येईल, इतकी देशाची क्षमता आहे, असे पाटील यांचे निरीक्षण आहे. ठिकठिकाणच्या खादी ग्रामोद्योग मंडळाने या कामी पुढाकार घ्यायला हवा. तरुणांमध्ये जिद्द निर्माण करायला हवी तर यात यश येईल. आपली कोणाही तरुणाला मोफत मार्गदर्शन करण्याची तयारी आहे. मात्र, कष्ट करून पसे कमवले पाहिजेत ही जिद्द तरुणात कमी होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मधाचा भाव २०० रुपये किलो आहे. या व्यवसायात नियोजनपूर्वक कष्ट केल्यास चांगले पसे मिळतात हा आपला गेल्या दहा वर्षांतील अनुभव असल्याचे ते म्हणाले. लातूरसारख्या भागातून हा व्यवसाय करीत असताना खादी ग्रामोद्योग मंडळाची वार्षकि गरज आपण पूर्ण करीत आहोत याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. खादी ग्रामोद्योग मंडळानेही दरवर्षी सहकार्याची भूमिका घेतली, त्यामुळेच हे शक्य होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लातूरकर दिनकर पाटील यांचा तरुणांसमोर वेगळा आदर्श
‘मधु मागसी माझ्या सख्यापरी! मधुघटची रिकामे पडती जरी!’ या काव्यपंक्ती अनेकांना माहिती आहेत.
Written by बबन मिंडे
First published on: 27-11-2015 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New role model in front of youngster by dinkar patil