सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर : धाराशीवमधील तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था बेवारस आणि गतिमंद मुलींसाठी आधारवड ठरली आहे. खाटेवर खिळून असणाऱ्या लहान मुलींसाठी शुश्रूषा केंद्र आणि मोठय़ा मुलींसाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी या संस्थेस आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

 कळंब तालुक्यात एचआयव्ही मुलांसमवेत काम करणाऱ्या शहाजी चव्हाण यांनी उभ्या केलेल्या संस्थेचा धाराशिव जिल्ह्यात नावलौकिक आहे. शहाजी चव्हाण यांना मदत करणारा मोठा चमू आता तयार होत आहे. अ‍ॅड. अनंत अडसूळ, रवींद्र केसकर, आत्माराम पवार, डॉ. अभय शहापूरकर यांच्यासह अनेकांनी संस्था उभारणीमध्ये मदत केली आहे. पण, पायाभूत विकासासाठी संस्थेला दात्यांच्या आश्रयाची गरज आहे.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : ‘नकोशीं’ना नवजीवन

‘‘मुलींबाबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर शोधत आहोत. पण, रोज नवे प्रश्न निर्माण होत आहेत. आता मोठय़ा मुली आणि लहान मुली यांना स्वतंत्र ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. खरे तर १६ वर्षांनंतरच्या बेवारस मुलींच्या प्रश्नावर राज्य सरकारनेही विशेष कार्यशाळा घेण्याची गरज आहे. बाल हक्क आयोग, महिला व बालकल्याण विभागातून यासाठी विशेष तरतुदीचीही गरज आहे. आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.’’, असे संस्थेचे शहाजी चव्हाण

सांगतात. ‘‘वेगवेगळय़ा भागांत मुलींना रस्त्यावर फेकून देण्याचे प्रमाण वाढते आहे. यातील अनेक गतिमंद आणि खाटेला खिळून असणाऱ्या मुलींसाठी शुश्रूषा केंद्र उभे करण्याची गरज आहे. खरे तर परदेशात अशा मुलींना दत्तक घेणारे पालकही आहेत. पण, समाज म्हणून आपण तेवढे प्रगत झालेलो नाही. त्यामुळे अशा केंद्राची गरज भासते आहे. असे केंद्र यंदा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दात्यांनी साथ द्यावी’’, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ngo tuljai pratishthan bahuuddeshiy sanstha work to upliftment of mentally challenged girls zws