औरंगाबाद : ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या प्राथमिक फेरीतून ५ मार्च रोजी औरंगाबादेत होणाऱ्या विभागीय अंतिम स्पर्धेसाठी नऊ उमेदवारांची निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी दिलेल्या चार विषयांवरील अभ्यासपूर्ण मांडणी, उत्तम शब्दांचा वापर, आवाजाची विशिष्ट लय, असा आविष्कार सादर करीत जवळपास सर्वच स्पर्धकांनी वक्तृत्व कलेचे सादरीकरण केले. या स्पर्धेला साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित असा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त केलेले प्रा. डॉ. वीरा राठोड व प्रा. रवी कोरडे हे परीक्षक म्हणून लाभले होते. या परीक्षकांनीच अंतिम फेरीसाठी नऊ स्पर्धकांची निवड केली.
औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालय परिसरातील ‘देवगिरी इन्स्टिटय़ूट अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज’ या इमारतीतील एडिसन सभागृहात ही स्पर्धा घेण्यात आली. याच इमारतीत ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता विभागीय अंतिम फेरी होणार आहे. प्रारंभी शुक्रवारी सकाळी एडिसन सभागृहात परीक्षक प्रा. डॉ. वीरा राठोड, प्रा. रवी कोरडे व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले देवगिरीचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजन व कुंडीतील रोपाला पाणी वाहून स्पर्धेचे उद्घाटन झाले.
प्रारंभी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेसाठी सकाळपासून मराठवाडय़ातील वेगवेगळ्या शहरांमधील स्पर्धकांनी हजेरी लावली. महाराष्ट्रातील आठही विभागातून निवडलेल्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी १७ मार्चला मुंबईत होणार आहे.
अंतिम फेरीसाठी निवडलेले स्पर्धक
* आकांक्षा चिंचोलकर (विजेन्द्र काबरा महाविद्यालय)
* आदित्य उदावंत (देवगिरी कला व वाणिज्य महाविद्यालय)
* प्रतीक्षा तोडमल (भगवान होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय)
* तेजस्विनी केंद्रे (शिवछत्रपती महाविद्यालय)
* राजनंदिनी वरकड (भगवान होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय)
* विजय वाकळे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय)
* संतोषी बिरादार (उदयागिरी महाविद्यालय, उदगीर)
* अनिकेत म्हस्के (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पत्रकारिता विभाग)
* सचिन पुंडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालय)
स्पर्धेसाठीचे विषय
१) ‘मी-टू’पणाची बोळवण.
२) ‘क्लोनिंग – माकडानंतर माणूस’
३) चरित्रपटांचे चारित्र्य
४) खेळ की नायक
‘पितांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धुतपापेश्वर व पुनित बालन एंटरटेन्मेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तू रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्टिटय़ूशन्स, इंडियन ऑईल कॉपरेरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.