महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सुनील केंद्रेकर यांच्याकडून काढून घेतल्यानंतर औरंगाबादकरांनी सामाजिक संकेतस्थळावरून प्रकट केलेला रोष तसा मोठय़ा आंदोलनात रूपांतरित होऊ शकला नाही. लोकनीती मंचच्या वतीने श्रीकांत उमरीकर यांनी केलेले लाक्षणिक उपोषण वगळता बुधवारी दिवसभर फारशी आंदोलने झाली नाहीत.
महापालिका आयुक्तपदी केंद्रेकरच राहावेत, अशी मागणी करीत सिव्हिक रिस्पॉन्स टीमने स्वाक्षरी आंदोलन चालू ठेवले, मात्र आंदोलनासाठी मोठी गर्दी मात्र कोठेच दिसून आली नाही. सकाळी क्रांती चौकातून एक मोर्चा निघेल, असे सांगण्यात आले होते, मात्र तो झाला नाही. लोकनीती मंचच्या वतीने उपोषणास बसलेल्या उमरीकर यांना मात्र अनेकांनी भेटून पािठबा व्यक्त केला. मात्र, या उपोषणाच्या तंबूतही औरंगाबादकरांनी गर्दी केली नाही. उमरीकर यांच्या समवेत श्रीकांत कुलकर्णी, सिद्धार्थ बनसोड, चंद्रकांत पाठक यांनीही उपोषण केले. सायंकाळी ५ वाजता त्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यांच्या आंदोलनास अॅड. प्रदीप देशमुख, प्रा. मोहन फुले, शरद अदवंत यांनी पािठबा असल्याचे उपोषणस्थळी जाऊन सांगितले. बहुतेकांनी निषेधाचा झेंडा सामाजिक संकेतस्थळावर फडकावला. पुणे येथून बदली होऊन येणारे अधिकारी ओमप्रकाश बकोरिया हेदेखील धडाडीचे अधिकारी असल्याचे सांगण्यात येत होते.
बहुतांश राजकीय पक्षांनी आंदोलनापासून स्वत:ला बाजूला ठेवले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चांगला अधिकारी बदलू नये, अशी विनंती केली, मात्र हा निर्णय केंद्रेकर यांच्या विनंतीवरूनच घेतला असल्याचे आवर्जून सांगितले जात होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या प्रश्नी अंग चोरल्याचेच दिसून आले. परिणामी, क्षीण आंदोलनाचा कसाबसा शेवट झाल्याने उद्या बकोरिया पदभार स्वीकारतील.
केंद्रेकरांच्या समर्थनाचा झेंडा उंचावलाच नाही!
महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सुनील केंद्रेकर यांच्याकडून काढून घेतल्यानंतर औरंगाबादकरांनी सामाजिक संकेतस्थळावरून प्रकट केलेला रोष तसा मोठय़ा आंदोलनात रूपांतरित होऊ शकला नाही.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-02-2016 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No flag heighten for sunil kendrekar justification