महाविद्यालयीन जीवनात मीही विविध स्पर्धामध्ये सहभागी झालो, पण कशातही यशस्वी झालो नाही. आमच्यातील गुण-अवगुण व सुप्त गुण कोणी ओळखलेच नाहीत. पण मी निवडणुकांचे तंत्र शिकलो आणि आजपर्यंत २३ पकी २२ निवडणुका जिंकलो. माझ्याकडे या क्षेत्रातील प्रमाणपत्राशिवाय दुसरे कोणतेही प्रमाणपत्र सापडणार नाही.. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी भाषणात या आठवणी जागवताच विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.
निमित्त होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित सहयोग युवक महोत्सवाच्या उद्घाटनाचे. बुधवारी मोठय़ा उत्साहात या महोत्सवाचे उद्घाटन झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने विष्णुपुरी येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
राज्यात सिंचनाच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला. कोटय़वधी खर्चून केवळ एक टक्का सिंचन क्षेत्र यशस्वी झाले. आपण कोणावरही टीका करणार नाही. पण भाजप सरकारने दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊनच जलयुक्त शिवारासारखी योजना राबवून गावातील पाणी गावातच अडवले. दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर युवक महोत्सव नको, अशी भूमिका अनेकांनी मांडली होती. दुष्काळाची जाणीव आम्हालाही आहे. हा महोत्सव झाला नसता तर आपल्या विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्य महोत्सवाला मुकावे लागले असते. त्यामुळे साध्या पद्धतीने हा महोत्सव घेण्यात येत आहे, असे सांगितले. स्वागताध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
आमदार प्रताप चिखलीकर, डॉ. तुषार राठोड, सहयोग सेवाभावी संस्थेचे संस्थापक व स्वागताध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, कुलसचिव डॉ.बी.बी. पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. राजेश्वर दुडुकनाळे, प्राचार्य विश्वनाथ भरकड यांची या वेळी उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ प्रतिमेचे व नटराजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
दुष्काळग्रस्तांसाठी निधी
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी युवक महोत्सवातील कलावंतांनी काढलेल्या शोभायात्रेतून निधी जमा करण्यात आला. ५१ हजारांचा निधी जमा झाल्यानंतर डॉ. संतुक हंबर्डे यांनी तो निधी रावसाहेब दानवे यांच्याकडे सुपूर्द केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा