शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार खुशाल झोपा काढते. शेतक ऱ्यांच्या मरणयातना कोणाला दिसत नाहीत का? असा प्रश्न विचारतानाच ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे ही फॅशन झाली आहे, अशी संभावना करणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही?’ असा खडा सवाल मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी येथे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना उद्देशून येथे केला.
प्रा. रावसाहेब ढवळे लिखित ‘सत्यशोधक : वसा आणि वारसा’, ‘प्राक्तनाची कोरीव लेणी’, ‘कामायनीतील प्रणयरंग’ आणि ‘रॉबर्ट गिल आणि पारो : शोकात्म प्रेमकहाणी’ या चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्या वेळी सबनीस बोलत होते. आमदार राजेश टोपे अध्यक्षस्थानी, तर साहित्यिक प्रा. प्रल्हाद लुलेकर व लेखिका रेखा बैजल उपस्थित होत्या. सबनीस म्हणाले, की आतापर्यंत शेतक ऱ्यांची पोरे मंत्रिपदे भोगत आली आहेत. ती शेतक ऱ्यांची आहेत की हैवानाची? लाखो रुपये पगार घेणारे प्राध्यापक गोटय़ा खेळतात आणि शेतक ऱ्यांच्या बांधापर्यंतही जात नाहीत. शेतक ऱ्यांची बेईमानी का करता? सचिव, कारकून शुद्ध आहेत का आणि हे सर्व खपवून घेणारे आपणही भ्रष्ट आहोत काय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर दाद मागण्यासाठी लवाद का नाही? शेतीमालाच्या उत्पादनखर्चाच्या आकडय़ात केंद्र सरकार ४० टक्क्यांनी कमी करीत असेल तर शेतकरी कसा वाचेल?
आपले साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण जानव्यातील नव्हेतर जाणिवेतील आहे. साहित्यसंमेलनाच्या इतिहासात आपण यापूर्वी अध्यक्षीय भाषणात न आलेला शेतकऱ्यांचा विषय मांडला. त्यातील सहा पाने शेतकऱ्यांच्या वेदनेवरील आहेत. या भाषणानंतर शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा हातात हात घेऊन माझे अभिनंदन करतो, यासारखी दुसरी पावती नाही. नैतिकता, पदव्यांच्या पलीकडे माणूसपणाची गरज, पुढाऱ्यांपर्यंतचा भ्रष्टाचार आदींसंदर्भात आमदार टोपे यांनी प्रारंभीच्या भाषणात केलेल्या उल्लेखांचा संदर्भ देत सबनीस म्हणाले, की त्यांच्या भाषणामुळे आपणास धक्काच बसला. याबद्दल भैयासाहेबांना मी जाहीर प्रणाम आणि अभिवादन करतो! अभिनंदन यासाठी ते माझ्या मनातील बोलले. प्रा. ढवळे यांना टोपे यांच्यासारखा संस्थाचालक लाभल्याबद्दल चांगले मत व्यक्त करून सबनीस यांनी, ‘नाहीतर पूर्वी खानदेशात असताना विजय नवल पाटील यांच्या संस्थेतील प्राध्यापकांना गाडीतून कडबा कसा काढावा लागायचा हे आपणास माहीत आहे’ अशी टिप्पणी केली.
महात्मा फुले यांचे तत्त्वज्ञान मानवतावादी आहे. आता सर्वच जातींत ब्राह्मणशाही दिसते. एका जातीचा दहशतवाद चूक आणि संरक्षणाच्या नावाखाली दुसऱ्या जातीचा दहशतवाद योग्य असे म्हणता येणार नाही. मराठा, इतर मागासवर्गीय किंवा इतरांमध्ये पोटभेद असतील तर त्याचे खापक ब्राह्मणांवर फोडण्यात काही अर्थ नाही. ब्राह्मणांतील जातीयवाद असहिष्णू आणि इतर जातीतील ब्राह्मणवाद सहिष्णू असे म्हणून चालणार नाही. विद्यापीठात शिकणाऱ्या रोहित वेमुलासारख्या विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते ही असहिष्णुता नाही का? धर्ममरतड, राजकारणी आणि अर्धवट विद्वान जातीयता जोपासतात.
कार्यक्रमाचे संचालन करणारे शशिकांत पाटील यांचेही कौतुक करण्यास सबनीस विसरले नाहीत. पाटील यांनी पुणे शहरातील सुधीर गाडगीळ यांच्या थोबाडीत मारणारे संचलन केले आहे, असे प्रशस्तिपत्रच त्यांनी देऊन टाकले.
अध्यक्षीय भाषणात टोपे म्हणाले, समाजातील चांगल्या बाबींचे श्रेय निश्चितच साहित्यिकांना आहे. परंतु चांगला माणूस घडविण्याचे आव्हान साहित्यिकांसमोर आहे. शालेय व उच्च शिक्षणात काही अभाव जाणवतात. पदवी देण्यासोबतच चांगला माणूस घडविण्याची क्षमताही शिक्षणात असली पाहिजे. भ्रष्टाचार, जातीयवाद, अन्याय-अत्याचार, नैसर्गिक संकटे आदींसंदर्भातील बातम्या वर्तमानपत्रात वाचल्यावर नाउमेद करणारी परिस्थिती आहे की काय, असे अनेकांना वाटते. त्यामुळे नवीन पिढी आणि शेतक ऱ्यांमध्ये उमेद निर्माण करणारी परिस्थिती व वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. ‘अस्मितादर्श’चा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. साहित्यातील योगदानाबद्दल प्रा. ढवळे आणि ऊर्मिला ढवळे यांचा सत्कार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा