िहगोली-अकोला रस्त्याची अवस्था कनेरगाव नाक्यापर्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे. दुरुस्तीस आलेला दोन कोटींचा निधी रस्त्यावर काळीमाती टाकल्याने खड्डय़ात गेला. आता या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या निविदा दीड महिन्यापूर्वी निघाल्या. मात्र, कामाच्या कार्यारंभास अजून मुहूर्त सापडला नाही.
िहगोली-अकोला-वारंगा-कळमनुरी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. परंतु गेल्या तीनचार वर्षांपासून िहगोली-कनेरगाव खड्डय़ात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत असल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे. रस्त्याची देखभाल करणाऱ्या अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग िहगोलीअंतर्गत अकोला-वाशिम-कनेरगाव-वारंगा राष्ट्रीय महामार्ग २०४ सध्याचा राष्ट्रीय महामार्ग १६१ येतो. सन २०१३-१४ पासून आतापर्यंत रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्याची वाट लागली. सन २०१२-१३ पासून हा रस्ता पूर्ण खराब झाला. डांबरी पृष्ठभागावर खड्डे काळ्या मातीने भरले व पूर्ण रस्ता खराब केला. त्यात भर पडली २०१३ च्या अतिवृष्टीची. या अतिवृष्टीत परत रस्त्यावर काळी माती भरून पूर्णत: रस्त्याचे तीन-तेरा वाजवले. खड्डय़ांत मातीचा भराव भरल्यामुळे वाहनधारक अक्षरश: घसरून जिवाला मुकले. विशेषत: किती तरी नवदाम्पत्य अपंग झाले. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्यामुळे कित्येक मालमोटारींचे अपघात झाले.
रस्ता दुरुस्तीसाठी सरकारने भरीव मदत दिली. परंतु अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमतामुळे दुरुस्तीचे काम कागदोपत्रीच जिरले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकूण २ कोटी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात रस्ता काळ्या मातीचाच राहिला. या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीवर खासदार राजीव सातव यांनी लोकसभेच्या सभागृहात आवाज उठविला. केंद्रीय मंत्री गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीच्या कामावर निधी मंजूर करून घेतला. िहगोली ते कनेरगावपर्यंत सुमारे १७ कोटी, िहगोली-कळमनुरी, कळमनुरी-वारंगा प्रत्येकी १५ कोटी या प्रमाणे तीन तुकडय़ांत हे काम होणार असून या कामावर एकूण ४७ कोटींचा खर्च मंजूर झाला. निविदा प्रक्रियेचे काम दीड महिन्यापूर्वी पूर्ण झाले. मात्र, कार्यारंभाचा मुहूर्त अजून सापडला नाही. दरम्यान, रस्त्याच्या कामावर झालेल्या खर्चाविषयी डॉ. अमोल अवचार यांनी माहिती अधिकाराद्वारे माहिती मागितली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा