पाण्याच्या दुíभक्ष्यामुळे लातुरातील सर्वच क्षेत्रांवर अरिष्ट ओढवले आहे. येथील एमआयडीसीत सुमारे २०० उद्योग आहेत. गेल्या काही वर्षांपासून उद्योगाची पाणीकपात वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याचा थेंबही मिळत नसल्यामुळे उद्योजक मोठय़ा अडचणीत आले आहेत. या वर्षी दुष्काळामुळे सगळय़ाच उद्योगांना अडचण निर्माण झाली आहे. त्यात पाणी नसल्यामुळे या अडचणीत मोठी भर पडली आहे.
लातूरच्या एमआयडीसीत कृषी प्रक्रिया उद्योगांची संख्या मोठी आहे. दालमिल, ऑईलमिल मोठय़ा प्रमाणावर आहेत. या दोन्ही उद्योगांना पाणी लागते. उद्योजकांना पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे खर्च वाढला. शेतीचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेत एकचतुर्थाश इतकीच आवक होत असल्यामुळे एरवी तीन पाळय़ांत चालवले जाणारे कारखाने आता कसेबसे एका पाळीवर चालवावे लागत आहेत.
लातूर एमआयडीसीत कीर्ती उद्योग समूहाचा मराठवाडय़ातील सर्वात मोठा ऑइल कॉम्प्लेक्स आहे. प्रतिदिन एक हजार टन क्षमतेचा हा कारखाना गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईमुळे केवळ २०० टन मालावरच प्रक्रिया करीत असल्याचे या उद्योग समूहाचे प्रमुख अशोक भुतडा यांनी सांगितले. या उद्योगाला दररोज १ लाख ५० हजार लिटर पाणी लागत असे. पाणीटंचाईमुळे टँकरने पाणी घेऊनही पाणी उपलब्ध होणे महाकठीण झाले. पाण्यामुळे संपूर्ण उद्योग बंद पडला तर मोठी अडचण निर्माण होईल हे लक्षात घेऊन पाण्याच्या पुनर्वापरासाठी सुमारे ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यामुळे आता दररोज केवळ ६ हजार लिटर पाण्यावर २०० टनांवर प्रक्रिया करता येते. मात्र, यंत्रणा चालू ठेवावी लागत असल्यामुळे प्रतिक्विंटल ६० ते ७० रुपये अधिकचा खर्च करावा लागत आहे.
पाण्यामुळे केवळ एका पाळीत कारखाना चालवावा लागत असल्यामुळे रोजचा ८ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.  शिवाय जे २०० टन उत्पादन होते त्याचा उत्पादन खर्च १ लाख ४० हजार रुपयांनी वाढला आहे. या ऑइल कॉम्प्लेक्समधील कामगार, हमाल, वाहतूकदार अशा एक हजारजणांना रोजगाराला मुकावे लागले आहे. पूर्ण क्षमतेने कारखाना चालवला तर सर्वाना रोजगार देता आला असता. मात्र, बाजारपेठेत दरवर्षीच्या तुलनेत उपलब्ध असणारा अत्यल्प कच्चामाल व पाण्याची अडचण यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे भुतडा म्हणाले. आणखी किमान चार महिने कारखान्याची ही स्थिती राहील व किमान १० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
कीर्ती उद्योग समूहाचा मोठा उद्योग आहे. मात्र, अन्य छोटय़ा उद्योगांना बसणारा फटका त्यांना सहन करण्यापलीकडचा आहे. या वर्षी कीर्ती उद्योग समूहातील एक हजारजणांशिवाय आणखी ३ हजारजणांना एमआयडीसीतील रोजगाराला मुकावे लागले आहे. बिहारची जी मंडळी काम करीत होती ती त्यांच्या प्रांतात परतली आहेत व राज्यातील मंडळींनी पुणे, मुंबई, नाशिक असे मिळेल तेथे काम करण्यासाठी स्थलांतर केले आहे.
शेतीमालावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग लातुरात आहेत. मात्र, दुष्काळामुळे त्यांना चांगलाच फटका बसला. ऑईलमिल व्यतिरिक्त डाळ मिलमधून तयार होणाऱ्या तूर, मूग, हरभरा या डाळींना देशभरात मागणी आहे. या वर्षी उत्पादनात ७० टक्के घट झाल्यामुळे उद्योगाचे कंबरडेच मोडले आहे. राज्य सरकारने लातूरमधील उद्योजकांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. पुढच्या वर्षी चांगला पाऊस झाला, तर सरकारच्या मदतीच्या माध्यमातून उद्योग उभे राहतील अन्यथा स्वतच्या बळावर उभे राहण्याची क्षमता त्यांच्या अंगी असणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा