छत्रपती संभाजीनगर : भोकरदनचे भाजप आमदार संतोष दानवे व परंड्याचे शिवसेनेचे (शिंदे) आमदार तानाजी सावंत यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी आमदार दानवे, सावंत यांच्यासह प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. या निवडणूक याचिकावर ८ आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.
तानाजी सावंत यांच्या निवडीस राहुल मोटे यांनी ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. मोटे यांनी याचिकेत म्हटल्यानुसार आमदार सावंत १ हजार ५०९ मतांनी विजयी झाले होते. सावंत यांनी अवैध मार्गाचा अवलंब केल्याचे पुरावे याचिकेसोबत जोडले आहेत. भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि क्रांती महिला उद्योग समूहाच्या अध्यक्ष अर्चना दराडे यांनाही याचिकेत प्रतिवादी केले आहे. सावंत यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रमांतर्गत मतदार संघातील महिलांना साड्या वाटप केल्या. क्रांती उद्योग समूहाच्या खात्यावर पैसे नसताना मोठ्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा करुन त्यातून महिला बचत गटांना पैसे वाटप केले. न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे सावंत कुटुंबातर्फे महिलांना साड्या व भांड्यांचे संच भेट दिले. कामगारांना विवाहासाठी व इतर कामांसाठी पैसे वाटप केले. आमिष दाखवून मते गोळा केली. धार्मिक आणि विखारी प्रचार करुन ध्रुवीकरणासाठी उघडपणे पत्रके वाटली. लाडकी बहिण योजनेद्वारे पैशांचे आमीष दिले.
वरील सर्व घटनांबाबत विविध संघटनांनी, अनेकांनी केलेल्या तक्रारींची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. सावंत थोड्या फरकाने आघाडीवर असताना मतांच्या पुनर्मोजणीची मागणी फेटाळली. सावंत यांनी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२३ नुसार अनेक गैरकृत्ये केल्याचे याचिकेत नमूद केले आहे. आमदार सावंत यांना अपात्र घोषित करावे. ते निवडून आल्याचा निकाल रद्द करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या निवडीस चंद्रकांत दानवे यांनी ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. आमदार दानवे यांच्याविरुद्धही अवैध मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार दानवे यांना अपात्र घोषित करावे. ते निवडून आल्याचा निकाल रद्द करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. आमदार दानवे यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.