पीकविम्यापोटी आलेली अडीचशे कोटींची रक्कम शेतकऱ्यांना थेट वाटप न करता संचालक मंडळाने चक्रांकित ठरावाद्वारे राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव करून मोठय़ा प्रमाणात व्याज मिळवले. या प्रकरणी ६ शेतकऱ्यांनी जिल्हा बँक संचालकांना बेकायदा गुंतवणूक करून फसवणूक केल्याप्रकरणी नोटीस बजावली. सात दिवसांत खुलासा करा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्याने विद्यमान संचालक मंडळात खळबळ उडाली. दरम्यान, माजी मंत्री सुरेश धस यांची पत्नी संचालक संगीता यांनी राजीनामा पाठवला असून, अन्य काही संचालकही राजीनामा देण्याच्या विचारात आहेत.
जिल्हा सहकारी बँक ५ वर्षांपूर्वी आíथक घोटाळ्याने बंद पडल्यानंतर प्रशासकाने बँकेच्या तत्कालीन जवळपास ५० संचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगाची वारी घडवली. सत्ताधारी-विरोधी पक्षाच्या दिग्गज संचालक नेत्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे नव्याने आलेले संचालक मंडळही धास्तीत आहे. विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने जूनमध्ये आलेल्या पीकविम्यापोटीचे २५१ कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांना वाटप न करता संचालक मंडळाचा चक्रांकित ठराव घेऊन इतर बँकांमध्ये मुदत ठेवीत ठेवून व्याज कमावले.
व्यावहारिकतेतून संचालक मंडळाने व्याज मिळवत बँकेचा व्यवहार सुरू केल्याचा प्रयत्न केला, तरी तो बेकायदा असल्याचा आरोप करीत अॅड. अजित देशमुख यांनी तक्रार केली. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ असल्याने प्रशासनाने फारशी दखल घेतली नाही. मात्र, नवनाथ लगड, सतीश लगड, प्रल्हाद काळे, परमेश्वर लगड व ज्ञानेश्वर लगड या शेतकऱ्यांनी एकत्रित जिल्हा बँक संचालकांना नोटीस पाठवली. पीकविमा रकमेचे गरनियोजन, व्याजासाठी बेकायदा गुंतवणूक व फसवणूक केल्याचा आरोप करीत सात दिवसांत खुलासा करावा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला.
पूर्वीचा गुन्हे दाखल होण्याचा आणि तुरुंगाची वारी मिळण्याचा अनुभव लक्षात घेता शेतकऱ्यांच्या या नोटिशीने नव्या संचालक मंडळात खळबळ उडाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांची पत्नी संगीता या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळात संचालक आहेत. त्यांनी संचालकपदाचा राजीनामा बँकेचे अध्यक्ष सारडा यांच्याकडे पाठवून दिला. अन्य काही संचालकही राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात येते.

Story img Loader