सध्याच्या घडीला ‘बुलेट’ची जशी क्रेझ आहे. तशीच काही वर्षांपूर्वी ‘राजदूत’ या दुचाकीची क्रेझ होती. गावात तिच्यावरून फेरफटका मारण्याची शान वेगळीच. सध्या अडगळीला गेलेली ती राजदूत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या सारणी (आ) या गावातील प्रदीप आणि प्रशांत सोनवणे या भावंडांची शान झालीय. दिवस उजाडला की त्यांच्या राजदूतला विचारायला गावातला कोणी तरी घरी नक्की येतो. त्याला कारण ही तसंच आहे. कारण त्यांच्या राजदूतनं फवारणीच्या कामाचं ओझं कमी केलंय. दोघेजण राजदूतच्या माध्यमातून सोयाबीनची फवारणी करतात. शेतीचं अवघड काम ‘डोक्यालिटी’ वापरली की कसं सहज सोप्प होतं, हेच या तरुणांनी दाखवून दिलंय.  ज्या मोटारसायकलवर गावभर फिरायचं त्याच मोटरसायकलने फवारणीचं काम कमी वेळात करतात.

शेतीची मशागत करणारे ट्रॅकटर पाहिल्यानंतर प्रशांतला ही कल्पना सूचली. छोटा भाऊ प्रदीपच्या मदतीनं दहा दिवसांपूर्वी त्याने घरच्या वर्कशॉपमध्ये वेळेची आणि श्रमाची बचत करणार यंत्र तयार केलं. त्यासाठी त्याने ३५ हजार रुपये खर्च केले. त्यातील दहा हजार रुपयांची त्यांनी पहिल्या दहा दिवसांतच कमाई केली. ही कल्पना सूचल्यानंतर चार हजार रुपयांना त्यांनी वापरलेली राजदूत खरेदी केली. त्यानंतर तिची स्पीड एडजेस्ट करत. पाठीमागच एक चाक काढून बाजूने दोन चाक टाकली. त्यावर पाण्याची टाकी ठेवली. समोरच्या बाजूला साडेतीन एचपीच इंजिन बसवले. पाठीमागच्या बाजूला पंधराफुटी पाईप टाकून त्याला दीड फुटावर एक याप्रमाणे दहा नवजल बसवून सुरु केली राजदूतवरून सोयाबीन फवारणी.

दोन वर्षापूर्वींच त्यांनी फवारणी यंत्र घेतलेल होत. घरच्या शेतातली शिवाय भाड्याने ते फवारणी करत होते. मात्र त्यासाठी खूप वेळ जायचा मेहनतही होती. मात्र या तंत्रज्ञानामुळे दोन्ही गोष्ठीची बचत झाली. वर्कशॉपमध्ये काम करत करत त्यांनी आतापर्यंत दहा हजार रुपये कमवले आहेत. एक्करी अडीचशे रुपये ते फवारणीसाठी घेतात. आणि खर्च येतो साठ ते सत्तर रुपये. दिवसाकाठी अठरा एक्कर फवारणी ही त्यांची सर्वाधिक फवारणी आहे. तेही इतर काम सांभाळत. दिवसभर फवारणी केली तर पंचवीस एक्कर आरामात होईल असे प्रशांतने यावेळी सांगितले. प्रशांतला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारलं तर दोन्ही भावंडाचं शिक्षण बारावी आहे. त्याच्या आवडीमुळे ते वर्कशॉप चालवतात. आणि त्याच आवडीनं हे यंत्र तयार झालं. सोयाबीन सोबतच उडीद, मूग, हरभरा या पिकाची फवारणी करण्यासाठी हे उपोयोगी येईल. शिक्षण जेमतेम असतानाही त्यांच्यातील आवडीने हे साध्य झालं.⁠⁠⁠⁠

Story img Loader