पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनच राज्यात आता अध्यात्माचे धडे!
राज्यात आता आध्यात्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून दिले जाणार आहेत. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्य सरकारने तयार केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील एक हजार अंगणवाडय़ांमध्ये कार्टूनच्या माध्यमातून रामायण व महाभारताच्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. केवळ एवढेच नाही, तर अंगणवाडय़ांची बांधकामे प्री-फॅब्रिकेटेड पद्धतीने करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे आयोजित विभागीय बठकीत ही माहिती दिली. औरंगाबाद येथे वार्षकि आíथक नियोजनाच्या विभागीय बठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील अंगणवाडी व बालवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा अभ्यासक्रम तसा आखून दिला नव्हताच. परिणामी ज्याला जे वाटेल तसे शिक्षण दिले जात होते. या अनुषंगाने लातूरच्या जगन्नाथ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम आखणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. आता हा अभ्यासक्रम तयार झाला असून, लवकरच तो जाहीर होणार आहे.
भाजप सरकार आल्याने शिक्षणातील भगवेकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे. रामायण, महाभारताचे धडे कार्टूनच्या माध्यमातून लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे.
नक्की काय होणार?
अभ्यासक्रमातील काही भाग अध्यात्माशी संबंधित असावा, असा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आग्रह होता. परिणामी काही अंगणवाडय़ा डिजिटल करून त्यात रामायण व महाभारतातील काही कथा अंगणवाडीतील मुलांना शिकवल्या जाणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात अंगणवाडीस आयएसओ प्रमाणपत्र मिळावे, या साठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नाशिक व अमरावतीमध्येही काही चांगले प्रयोग करण्यात आले. त्याचा एकत्रित आढावा घेऊन एक हजार अंगणवाडय़ांमध्ये डिजिटल सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गर्भवती मातांशी कुपोषण व बालकांच्या आहाराबाबतच्या प्रबोधनासाठी ऑनलाईन सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंगणवाडीसाठी उद्योगांच्या सीएसआर फंडातून काही निधी मिळविण्यासाठी विशेष बठकही घेतली जाणार आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार व पंकजा मुंडे ही बठक लवकरच घेणार आहेत.