न्यायालयाने मुलीस पोटगी देण्याचे आदेश दिले असतानाही ती रक्कम न देता कुटुंबीयांना धमकावणे सुरूच असल्याच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे हताश झालेल्या वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथील रहिवासी उत्तम माधवराव निकम या ७० वर्षांच्या वृद्धाने ग्रामीण विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
उत्तमराव निकम यांची मुलगी भारती गीताराम शंखपाळ हिला व तिच्या मुलास पती गीताराम याने दरमहा अनुक्रमे दीड हजार रुपये व एक हजार रुपये द्यावेत, असा आदेश वैजापूर येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, पती गीतारामने रक्कम न देताच उत्तम निकम कुटुंबास धमकावणे सुरू केले. त्यानंतर भारतीचे अपहरण केल्याची तक्रार निकम यांनी शिऊर पोलीस ठाण्यात १९ नोव्हेंबरला केली. ४५ दिवस उलटूनही या तक्रारीची दखल न घेतल्याने निकम यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी निकम यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा