उस्मानाबादेतही अवकाळी पाऊस
हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्य़ांच्या काही भागात रविवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे शेतात झाडाखाली थांबलेल्या सुधाकर आनंदा मोरे यांचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.
जिल्ह्य़ात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील इडोळी येथील कान्होपात्रा संतोष जाधव (वय २३) या युवतीचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला, तर लीलावती जाधव ही महिला गंभीर जखमी झाली होती. शुक्रवारी कळमनुरीत गारांचा पाऊस झाला. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सायंकाळी आखाडय़ावर वीज पडून हसीना शेख खदीर (वय ४०) ही महिला जखमी झाली. गेल्या ४ दिवसांपासून हिंगोली जिल्ह्य़ात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. रविवारीही दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे सुधाकर आनंदा मोरे (वय ३२) शेतात काम करीत होते. वादळी पाऊस सुरू झाल्याने मोरे बाभळीच्या झाडाखाली थांबला असता अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. िहगोली, सेनगाव, कळमनुरीत पावसाने हजेरी लावली.
वाशी, खानापूर, इंदापूरला पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाशी तालुक्याच्या विविध गावांत रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यात विजेच्या तारा, जनावरांचे गोठे व शेतात काढून टाकलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहिले.
सकाळनंतर वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात पावसाचे ढग जमा होऊन पावसाळ्याप्रमाणे वातावरण तयार झाले.
काही वेळातच हलक्या मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली. गोजवाडा, इंदापूर, खानापूर परिसरात अधिक प्रमाणात पाऊस झाला. खानापूर शिवारात जनावरांचे गोठे वादळी वाऱ्याने उडून नुकसान झाले. विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे खानापूर शिवारातील वीज खंडित झाली. गोजवाडा येथे हलक्याशा गारा पडल्या.
इंदापूर येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. शेतकऱ्यांनी कांदा रानावर अंथरला होता. अचानक ढगाळ वातावरण आणि नंतर पावसाने हजेरी लावल्याने हा कांदा भिजला.