महिनाभरात महाराष्ट्र वीजकपातीच्या धोरणामुळे होरपळून निघाला. आता मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे कारण पुढे करीत वीज कपात करणे थांबवले असले तरी त्यामागे नागरिकांमध्ये सरकारी यंत्रणेविषयीचा पसरत असलेल्या संतापाचेही एक कारण आहे. आता तर वीज मुबलक असल्याचे सांगण्यात येत आहे.
वीजनिर्मिती आणि वितरण यंत्रणेत सरकारची अनास्था किती असावी, याचे उदाहरण म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातून निर्मित होणाऱ्या विजेसंदर्भाने देता येईल. परळी केंद्रातून १३८० पेक्षा अधिक मेगावॅटने वीजनिर्मितीची क्षमता आहे. मात्र सद्य:स्थितीत तेथील आठ संचांपैकी केवळ एकच संच क्रमांक सहामधून वीजनिर्मिती सुरू आहे, आणि तीही केवळ १४० ते १६० मेगावॅट. वस्तुत संच क्रमांक सहाची क्षमता २५० मेगावॅटची आहे. शुक्रवारी संच क्रमांक आठ सुरू करण्याचे आदेश धडकल्यानंतर रात्री उशिरानंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीस सुरुवात होणार आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, या आदेशासोबतच संच क्रमांक ७ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तो बंद का करायचा तर विजेची मागणी घटली आहे, असे कारण दिल्याची माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कार्यालयाकडून देण्यात आली.
परळी औष्णिक वीज केंद्राची निर्मिती क्षमता १३८० मेगावॅट आहे. परळीत ३५ वर्षांपूर्वीचे येथे पाच संच आहेत. त्यातील ३,४,५ हे २१०
मेगावॅटचे तीन संच पूर्णपणे बंद आहेत. अगदी अवसायनात काढण्यात आले आहेत. संच चार-पाच हे २५ वर्षांपूर्वीपेक्षाही जुने आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने मध्यंतरी २५ वर्षांपेक्षा जास्त जुने संच अवसायनात काढण्याचे आदेश काढल्याने संच क्रमांक पाचही बंद ठेवण्यात आला आहे. प्रत्येकी २५० मेगाव्ॉट वीजनिर्मिती क्षमतेचे संच क्रमांक सहा, सात सुस्थितीत म्हणावे असे आहेत. संच क्रमांक आठचे या वर्षी १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरजवळील कोराडीतून लोकार्पण करण्यात आले होते. त्याच्या आठवडाभरातच संच आठ बंद पडला. कोळसा वाहून नेणारा पट्टा व इतर काही कामांत तांत्रिक दोष काढून संच ८ बंद करण्यात आला होता. मात्र तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मते मुळात संच ८ चे कामच अत्यंत निकृष्ट असून तो फार काळ चालणे कठीण आहे. मागील पाच-साडेपाच महिन्यांत जेमतेम एक महिनाही संच क्रमांक आठ चालला नाही. संच सुस्थितीत आणून चालावा, यासाठी फार काही प्रयत्न होतानाही दिसत नाहीत. एका वेळी सहा, सात व आठ हे संच सुरू ठेवले जात नाहीत. आता संच आठ सुरू करायचा तर सात बंद करा, असे आदेश काढण्यात आले आहेत.
पाणी आहे तर कोळसा नाही
परळीतील औष्णिक विद्युत केंद्र तीन वर्षांपूर्वी पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली होती. मराठवाडय़ात २०१३-१५ या सलग तीन वर्षांत पावसाअभावी भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे औष्णिक विद्युत केंद्राला पुरवठा करण्यात येणारे खडका धरणही आटले होते. त्या वेळी पाण्याअभावी विद्युत केंद्र बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. गतवर्षी व या वर्षी मुबलक पाऊस होऊनही परळीतून अपेक्षित वीजनिर्मिती होऊ शकत नाही. या वेळी विजेसाठी पोषक उष्मांकाच्या कोळशाचा पुरवठा होत नसल्यामुळे वीजनिर्मिती करता येत नाही, असे कारण दिले जातेय. पूर्वी स्थानिक पातळीवरील राजकारणाचे कारण सांगितले जायचे. आता मात्र राज्यपातळीवरूनच परळीतील विद्युत केंद्राकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आता समोर येऊ लागले आहे.
शेतीपंपांची ९,७३७ कोटींची थकबाकी
महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, नांदेड व लातूर परिमंडलातील ११ जिल्हय़ांतील शेतीपंपांच्या वीज ग्राहकांकडे ९,७३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयअंतर्गत मराठवाडय़ासह खानदेशातील ११ जिल्हय़ांचा समावेश होतो. महावितरण मंडल कार्यालयमधील शेतीपंप वीज ग्राहकांकडील थकबाकी अशी- औरंगाबाद शहर २,०४२ ग्राहकांकडे १५ कोटी ८२ लाख. ग्रामीण- २,१२,४७४ ग्राहकांकडे १,३४८ कोटी ५३ लाख. जालना- १,१९,९४० ग्राहकांकडे ९५० कोटी ४६ लाख. जळगाव- १,९२,८२३ ग्राहकांकडे १,५६८ कोटी २८ लाख. नंदूरबाद- ४७,६०७ ग्राहकांकडे ३६० कोटी ६५ लाख. धुळे- ८८,८२८ ग्राहकांकडे ६०५ कोटी ८६ लाख. नांदेड- १,२२,३८४ ग्राहकांकडे ८७९ कोटी ३९ लाख. परभणी- ९२,६४८ ग्राहकांकडे ७३८ कोटी ४२ लाख. हिंगोली- ७०,६६० ग्राहकांकडे ५०३ कोटी ८३ लाख. लातूर- १,२१,७१० ग्राहकांकडे ७३१ कोटी ४३ लाख. बीड- १,६७,३३४ ग्राहकांकडे १,१२६ कोटी ५६ लाख. उस्मानाबाद-१,४४,३६३ ग्राहकांकडे ९०७ कोटी ८२ लाख. अशी एकूण १३,८२,८१३ शेतीपंपांच्या वीज ग्राहकांकडे ९,७३७ कोटी ०५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
परळीतील संच क्रमांक सात विजेची मागणी घटल्यामुळे बंद करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे संच क्रमांक सात बंद ठेवला आहे. तर संच आठ सुरू करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत संच सुरू करणार आहोत.
– आर. एम. राजगळकर, परळी औष्णिक विद्युत केंद्र.