शेतीत पारंपरिक पिके घेऊन त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे प्रमाण वाढले आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी विभागाने वेगवेगळय़ा पीक पद्धतींचा अभ्यास करून गेल्या वर्षीपासून कांदा लागवड सोयाबीनपेक्षा कशी आíथक हिताची ठरू शकते, हे पटवून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या वर्षी सुमारे ५ हजार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड खरीप हंगामातच करण्याची तयारी झाली होती. पावसाने दगा दिल्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी ऊस मोडून रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली.
नाशिक परिसरात राज्यात सर्वाधिक कांदाउत्पादन घेतले जाते. तेथील कांदा विक्रीसाठी लातूरच्या बाजारपेठेतही येतो. याच वाहनांतून या बाजारपेठेतून ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी खरेदी केल्या जातात. कांदाउत्पादक शेतकऱ्याला लातूर परिसरातील शेतकऱ्यांच्या तिपटीने पसे मिळतात. येथील शेतकरी एकरी १० हजारांच्या आतच उत्पादन घेतो. लातूर परिसरात वर्षांनुवष्रे कांद्याचे उत्पादन घेणारे शेतकरी असले, तरी त्याचे प्रमाण कमी होते. बाजारपेठेत माल अधिक आला की भाव पडतो, त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घ्यायला शेतकरी धजत नाहीत.
रांजणी येथील बी. बी. ठोंबरे यांनी कांदाउत्पादक शेतकऱ्यांसाठी १०० टन क्षमतेचा निर्जलीकरण प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले. कांदा कापून त्यातील पाणी काढले जाते व हा कांदा अधिक काळ ठेवून बाजारपेठेच्या गरजेनुसार विकला जातो. ठोंबरे यांनी शेतकऱ्याला किमान १० रुपये किलो भावाने कांदा खरेदीची हमी दिली. कांद्याचे रोप लावण्यापेक्षा नाशिकप्रमाणे या परिसरात कांदापेरणी सुरू झाली आहे. एकरी अडीच किलो बियाणे लागते. ७०० रुपये किलोने बियाणे उपलब्ध होते. पंचगंगा एक्सपोर्ट, एलोरा एक्सपोर्ट, भीमा सुपर, नाशिक रेड ५३ हे वाण बाजारपेठेत चढय़ा भावाने विकले जात असल्यामुळे त्याचाच पेरा शेतकरी करतो आहे. गतवर्षी रब्बी हंगामात सुमारे १ हजार एकरवर कांद्याची पेरणी झाली. यावर्षी ५ हजार एकरावर क्षेत्र वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या गटाने कांदापेरणी यंत्रही खरेदी केले.
कमी पावसामुळे उसाचे क्षेत्र कमी होत आहे. त्यातून ऊसउत्पादक शेतकरी कांद्याचा प्रयोग करण्यास पुढे येत आहे. लातूर तालुक्यातील हरंगुळ, औसा तालुक्यातील आशिव, उजनी, मातोळा, निलंगा तालुक्यातील सायाखान चिंचोलीण, उदगीर तालुक्यातील लोहारा येथे कांद्याचे क्षेत्र नव्याने सुरू झाले. एकरी १० ते १५ टन कांद्याचे उत्पादन मिळते. खुरपणीऐवजी तणनाशकाचा वापर करता येत असल्याने लागवडीचा खर्चही कमी होत आहे. हैदराबाद व सोलापूर या मोठय़ा बाजारपेठा लातूरला जवळ असल्यामुळे विक्रीची सोय आहे. शिवाय बाजारपेठेत भाव पडले तर बी. बी. ठोंबरे यांनी देऊ केलेला हमीभाव असल्यामुळे शेतकऱ्याला थोडासा धीर आला आहे.
कांद्यासाठी रेनपोट तुषारसंच बाजारपेठेत दाखल झाले असून, नेहमीच्या तुषार संचापेक्षा पाणी बाहेर फेकण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे, ज्यामुळे कांद्याला योग्य प्रमाणात पाणी मिळेल. शेतकरी नवे प्रयोग करण्याच्या मनस्थितीत आहेत. कारण आíथक संकटातून बाहेर पडण्यासाठी तो वाट शोधत आहे. कांद्याच्या उत्पादनात परंपरागत शेतीपेक्षा अधिक लाभ होतो, याचा अनुभव शेतकऱ्यांना आला, तर लातूर परिसरात कांद्याचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांना या बाबतची योग्य माहिती घेऊन ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. मोरे यांनी सांगितले.
या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळत आहे. औशाचे सुरेशअप्पा कारंजे यांनी १९१ पोती कांदा सोलापूरला पाठवला. त्यांना १ लाख ९६ हजार रुपयांची पट्टी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी कांदा उत्पादकांना चांगले पसे मिळत असल्यामुळे उसासारखे पीक वर्षभर भरपूर पाणी देऊन पोसून २ रुपये किलो दराने साखर कारखान्याला द्यायचे व त्याचे पसेही हप्त्या-हप्त्याने घ्यायचे. यापेक्षा तीन महिन्यांत हाताला येणारा भाजीपाला करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. कांद्याबरोबरच सध्या टोमॅटो, कोिथबिर यांचेही भाव वाढले असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सुवर्णसंधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा