काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही रणकंदन सुरू आहे. राहुल गांधी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण, राहुल गांधी वीर सावरकरांची माफी मागवी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा, अशा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
“राहुल गांधींनी वीर सावरकरांचा पाचवेळा अपमान केला आहे. आताही राहुल गांधींची भूमिका बदलली नसून, माफी मागितली नाही. ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाहीत. उद्धव ठाकरेंना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी,” असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं.
हेही वाचा : अमल महाडिकांचे आव्हान, ऋतुराज पाटील दंड थोपटत बिंदू चौकात आले अन्…; कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं
“वीर सावरकरांची अवहेलना करत इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकदा नाही जाणीवपूर्वक पाचवेळा अपमान करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : “बंटी पाटील ९६ कुळी पाटील नव्हे, तर…”, धनंजय महाडिकांची घणाघाती टीका
यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रात कोणी कोणाला येऊ देणार नाही, अशा गोष्टी करू नये. राहुल गांधी काश्मीर-श्रीनगरला जाऊन आले. मग, महाराष्ट्र काय काश्मीर-श्रीनगर आणि पाकिस्तानात नाही. महाराष्ट्रात कोणीही येऊ शकते. त्यामुळे भाजपाने याला येऊ देणार नाही, त्याला देणार नाही, अशी भाषा करू नये. जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्यांचा पायच शिल्लक ठेवणार नाही,” अशा शब्दांत अंबादास दानवेंनी अप्रत्यक्षपणे बावनकुळेंना बजावलं आहे.