युतीपूर्वी आमच्यात मतभेद होते, त्यावेळी आम्ही भाजपावर जाहीर टीका केली. पण हे मतभेद शिवसेनेने कधीही राज्याच्या विकासाच्या आड येऊ दिले नाहीत. आम्ही एकमेकांमध्ये कधीही तंगड घातलं नाही, असा एकतरी मुद्दा दाखवा, असे स्पष्टीकरण देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरही टीका केली. आघाडी करताना हातात हात घालून त्यांनी तंगड्यात तंगडं घातलं आहे, त्यामुळे ते नक्कीच पडणार असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
"आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे, पडणार ते नक्कीच."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/EE9jD7MNAI— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 17, 2019
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद येथे शिवसेना-भाजपा युतीच्या संयुक्त मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे. तसेच राज्यातून भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकडया नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये.
शरद पवारांवर टीका करताना ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच मला गोरगरीबांच्या मुलांची पहिल्यांदा काळजी घ्यायला हवी, त्यांचे लाड करायला हवेत असेच शिकवले आहे. तसेच राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले होते की, ईडीच्या भीतीने यांनी युती केली. मात्र, ईडीची भीती आम्हाला नाही तर तुम्हाला आहे. या ईडापिडा तुमच्याकडे आहेत आमच्याकडे नाहीत.
जनतेला मी जे वचन दिलं होतं ते मी पाळलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ५०० फूटांपर्यंतच्या घरांचं मालमत्ता कर आणि नाणार प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावेळीही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आम्ही पुढे गेलो, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.