छत्रपती संभाजीनगर : अपघातात जखमी झालेल्या तरुणाला वैद्यकीय पथकाने अखेर बुधवारी दुपारनंतर मेंदूमृत घोषित करण्यात आले. मृत गोकुळदास बाबूराव कोटुळे (वय ३७) यांच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सायंकाळी शहरामध्ये ग्रीन काॅरिडाॅर निर्माण करून हृदय, यकृत मुंबईत तर फुफ्फुसे अहमदाबादेत पाठवण्यात आले, तर दोन मूत्रपिंड आणि दोन नेत्र येथील स्थानिक दोन रुग्णालयांत प्रत्यारोपणासाठी देण्यात आल्याची माहिती येथील गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाकडून देण्यात आली.
बीड जिल्ह्यातील वांगी येथील गोकुळदास कोटुळे हे अपघातात गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी येथील गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व प्रयत्नांनंतर अखेर गोकुळदास यांना मेंदूमृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्या पत्नी कोमल कोटुळे, वडील बाबुराव कोटुळे आणि भाऊ दत्तू बाबुराव कोटुळे यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. डाॅ. विजय मुंढे, डॉ. राहुल वहाटुळे, डॉ. विनोद चावरे, डॉ. अमोल खांडे आणि डॉ. बालाजी बिरादार यांनी पुढील प्रक्रियेसाठीची तयारी करून दिली. अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया डॉ. वाजिद मोगल यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. अभिमन्यू माकणे, डॉ. उमेश काकडे, डॉ. देवेंद्र लोखंडे, डॉ. सुजाता चांगुळे आणि डॉ. जयेश टकले यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.

गोकुळदास यांचे एक मूत्रपिंड (किडनी) गॅलेक्सी व एक एमजीएम रुग्णालयात रुग्णावर प्रत्याराेपित करण्यात आली. हृदय मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात, यकृत ग्लेनईगल्समध्ये तर फुफ्फुसे (लंग्स) अहमदाबादेतील केडिया रुग्णालयात पाठवण्यात आले. नेत्र (कॉर्निया) स्थानिक रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यात आले. सर्व अवयव हरित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) द्वारे, स्थानिक पोलीस विभागाच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने, विमानतळावर वेळेवर पोहोचविण्यात आले, असे गॅलेक्सीकडून सांगण्यात आले.